____________________________प्राजु____चार गझला___________________


1.

वाच माझे मन सख्या तू आणखी काही नको;
हाच प्रेमाचा पुरावा वेगळी ग्वाही नको.

फक्त मी विसरुन जावे दु:ख माझे पळभरी;
सौख्य गरिबासारखे दे मोजके,... शाही नको.

पावसाची रम्य हिरवळ, अन वसंती रंगही;
पाहु दे सारेच मोसम.. वर्षभर लाही नको!

मूक फुलणे आज व्हावे, गलबला त्याचा नको;
आपले आपण फुलू... पाऊस-वाराही नको.

चालले आहे बरे.. आनंद आहे.. क्षेमही;
वेगळी आशा नको, नंतर निराशाही नको.

2.

वसंत नव्हता, नव्हता श्रावण, तरिही दरवळ?
म्हणे फुलांचा झाला होता ऋतूंत गोंधळ!

कितीकितीदा आवरले मी तुला तरीही,
जिभे तुझी का चालू आहे उगाच वळवळ?

दूर दूरवर जाती नजरा रोज पावसा;
किती तर्‍हेने तुझी करावी सदैव अटकळ?

गोठुन गेल्या अश्रूला हा रुमाल म्हणतो,
"जाऊ दे ना! किती ताणशी, आता ओघळ!"

कुणी कसेही फ़ुंकावे, आवाजच व्हावा!
नाते अपुले होते का रे इतके पोकळ?

ओढ कधी ना मला वाटली तुझी जीवना;
इतकी होती तरी कशी  श्वासांची वर्दळ?

गेलास असा माझे सगळे घेउन सोबत;
सख्या तुझे मी नाव ठेवले आहे वादळ.

पापण्यातली स्वप्ने आता मलाच म्हणती,
'प्राजू' का गं तुला वाटतो आम्ही अडगळ?

3.

दाटले डोळे,नका सांगू कुणी हासायला;
ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला?

पाहिले जे स्वप्न गेले दूर निघुनी अन् अता;
जायबंदी नीज येते रोज मज भेटायला.

द्यायचे आहेच काही, आणखी 'तू' दु:ख दे;
अन्यथा आधी शिकव 'तू' सौख्यही भोगायला.

वेदना भरते सदा पाणी पहा माझ्या घरी;
आणि ना थकता उभी आहे व्यथा रांधायला.

मी कुठे जाहिरपणे रडले कधी तुमच्या पुढे;
सांत्वना घेऊन का येता मला भेटायला?

जाणते मी बस क्षणाची साथ ही आहे 'सुखा';
'दु:ख' तू थोडेच असशी जन्मभर नांदायला!

जीवना गणिते तुझी चुकतात सारी नेहमी?
पद्धतीने वेगळ्या तू शीक ना मांडायला.

4.

सरींवरती जरा व्हावा उन्हाचा मंद शिडकावा;
नव्याने सप्तरंगी ध्वज नभाशी आज फडकावा.

कधी झालेच नाही जे अता ते होउनी जावे;
फुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा.

किती गोडी गुलाबीने उभा संसार चालू हा;
जरा एखाद मुद्दा वाद घालायास हुडकावा.

किती कोमट जगायाची मनाला या सवय झाली;
निखारा एक क्रांतीचा उराशी आज भडकावा.

किती कंटाळवाणी गलबते येती किनार्‍याशी;
अता वाटे तडाखा वादळाचा येथ थडकावा.

तुला ना पाहिले देवा कधी मी आजतागायत;
तरी का ना तुझ्यावरचा अढळ विश्वास तडकावा?

तुझे ना नावही त्याने कधीही घेतले 'प्राजू';
तरी त्यालाच पाहूनी तुझा का ऊर धडकावा?
______________________________________



1 टिप्पणी:

  1. किती कोमट जगायाची मनाला या सवय झाली;
    निखारा एक क्रांतीचा उराशी आज भडकावा. Wah...!!!!!!!!!

    उत्तर द्याहटवा