1.
मानला ताईत.... बसला फास ज्याचा;
पुत्र तो थरकाप उडवे काळजाचा.
येथली स्थित्यंतरे 'त्याच्या'चसाठी;
आजही आहे 'तिच्या'स्तव तोच साचा!
कैफियत मांडू कशी माझी इथे मी;
बोलताना वाटते जाईल वाचा.
यायचा नाही तुला अंदाज माझा;
लिंपलेला चेहरा, हृदयास खाचा.
आरसा त्याच्या मनाचा तडकलेला;
स्पर्शण्या धावू नको रुततील काचा.
जेवढा काढायचा तो यत्न करतो,
तेवढा चिखलात फसतो पाय त्याचा!
लांबचा पल्ला तुला गाठायचा तर...
सोस कळ पायातली...झिजणार टाचा.
पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे...
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा.
2.
मला जेव्हा समेवर यायचे असते;
लयीला नेमके बिनसायचे असते.
वहाण्याची जिथे सुरवात झालेली...
प्रवाहाने तिथे थांबायचे असते ?
तुला वाटेल 'ते ते' स्पष्ट केले तू;
तिला वाटेल जे वाटायचे असते!
प्रकाशाचा पुढे पर्याय असतो पण
धुक्यामध्येच रेंगाळायचे असते.
असे होईल हा अंदाज नसतो ना ?
गमवलेले खरे कमवायचे असते.
कधीही घे,कितीदाही परीक्षा घे;
इथे उत्तीर्ण कोणा व्हायचे असते?
गजर बघ वास्तवाचा वाजतो आहे;
पुन्हा स्वप्नातुनी जागायचे असते.
3.
तू असल्याच्या आभासांवर तगले आहे;
तुझ्याविना मन रमवायाला शिकले आहे.
जाणुन आहे कुणी कुणाचे नसते तरिही...
येउन बघ ना कुठे कशी भरकटले आहे!
जितक्यावेळा खरेपणाची कास धरावी;
तितक्यावेळा तद्दन खोटी ठरले आहे.
हजारदा ना भेटायाचा निश्चय केला;
हजारदा त्याच्यापासुन डळमळले आहे!
जादूची कांडी आहे का त्याच्यापाशी;
पुन्हा नव्याने मीच मला सापडले आहे.
प्रत्येकावर प्रेम कसे तू करतो देवा;
अपुल्यावर करण्यातच गाडे अडले आहे.
4.
मनाला आपल्या समजावतो आपण;
खरे-खोटे खरेतर जाणतो आपण.
नको तेव्हाच जातो तोल दोघांचा...
हवा तेव्हा किती सांभाळतो आपण!
मनामध्ये तुझे येणे असे माझ्या...
जसा की श्वास घेतो-सोडतो आपण.
पुन्हा देऊन जातो चाट मुद्दयाला;
शिताफीने अवांतर बोलतो आपण.
नशा मिस-यातली होते तुझ्यालेखी;
अताशा सोवळ्याने भेटतो आपण.
तुझ्या-माझ्यातल्या भिंतीस पाडूया ?
नको तेथे उगाचच खोदतो आपण!
______________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा