_________________गणेश शिंदे________तीन गझला_________________


1.

माझा प्रवास वेडा,म्हणतात सर्व वारे,
फुलवून पाहती का माझ्यातले निखारे?

माझ्या दुखावरी दे,गझले अता उतारा;
जगलो तुझ्यामुळे तर,फेडीन पांग सारे.

अमरत्व तू उगाचच,देतो मला कशाला;
असशील देव तर मग, दोन्ही मिळव किनारे.

कुंपण कशास वेडे,तू घातले मनाला;
कळतील का तुला मग,श्वासातले शहारे?

भरणार पोट नाही,कविकल्पनेत माझे;
ताटात काय घेवू,स्वप्नामधून तारे?

2.

जाते कसे अचानक, हे एक साल मागे;
देहात पेटलेले,ठेवून हाल मागे.

शैशव असेच माझे,आले तसेच गेले;
पोटातल्या भुकेची,होती मशाल मागे.

जगतो तसा बरा मी,सोबत विवंचनांच्या;
फुकटात श्वास तोवर,घेतो खुशाल मागे.

काळीज वाढवावे, जगणे लहान येथे;
ठरले कधीच जाणे,सोडून पाल मागे.

झंकारल्या जिण्याची,मैफल अखेर सरता;
निःशब्द काळजाचे, उरतात ताल मागे.

गेल्या क्षणास माझा,नेहमी सलाम आहे;
त्यांच्यामुळेच सुटले,सगळे सवाल मागे.

नुकता जगायचा मी,केला कुठे 'गणेशा',
अन नेमकाच मृत्यू,हसला जहाल मागे.

3.

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते;
आधाराला कोणी नसले की मन छळते.

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती;
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते.

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे;
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते.

मी नसले की वा-यावरती लक्ष असू दे;
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते.

बांधावरचे सुकले होते झाड जरासे;
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते.

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते;
घरात गेल्यावर कळते,छप्परही गळते!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा;
ते तर नक्की सूर्याइतके सत्य उजळते.

_________________________________
गणेश शिंदे,दुसरबिडकर
९९७५७६७५३७

३ टिप्पण्या: