1.
आले चुकून पाणी डोळ्यात सांजवेळी;
भलतीच आणिबाणी डोळ्यात सांजवेळी.
झाले प्रयत्न सारे विसरून जावयाचे;
पण तरळते कहाणी डोळ्यात सांजवेळी.
धावा कसा करावा आता मला कळेना;
झरते अभंगवाणी डोळ्यात सांजवेळी.
असतो प्रयास माझा दुःखास झाकण्याचा;
उरते तरी निशाणी डोळ्यात सांजवेळी.
बघ पापणीत माझ्या येऊन थांबलेली,
ही आसवे शहाणी डोळ्यात सांजवेळी.
मी आठवू कशाला ती कालचीच घटना;
झाली जुनी पुराणी डोळ्यात सांजवेळी.
2.
वेदनेला ती उराशी माळते;
मी जसा आहे तसा सांभाळते.
खूप काही कौतुकाने सांगते;
खूप काही बोलण्याचे टाळते!
प्रेम करते का कुणी दुःखावरी;
ही शहाणी त्याचवरती भाळते.
धीट ती आहे तसे मी जाणतो;
मात्र अश्रू एकट्याने ढाळते.
हा "दिवाकर" हार आता मानतो;
जीव इतका ती स्वतःचा जाळते.
3.
खांद्यावरच्या पदराला ती बोटावरती बांधत असते;
जणू काय ती ह्या चाळ्यांनी दोन जिवांना सांधत असते.
रागलोभ अन् हेवेदावे इथे न चुकले कधी कुणाला;
विकार असले उखळामध्ये टाकून आता कांडत असते.
तिच्यामुळे ह्या घरास माझ्या घरपण आले उघड सत्य हे;
तिची नोकरी सांभाळुन ती घरात सुद्धा रांधत असते.
इथे तांबडे फुटण्याआधी जुंपुन घेते रोज स्वतःला;
असे खपोनी घरास अमुच्या नीटनेटके मांडत असते.
तिला न जमले कधी कुणाशी वाद घालणे भांडण करणे;
पण नियतीशी ती एकाकी झुंजत असते,भांडत असते!
अता न उरली मला काळजी "दिवाकराच्या" संसाराची;
विष्णू संगे जशी लक्षुमी तशी इथे ती नांदत असते.
4.
दिव्यातील जळती जणू वात आहे;
उभा जन्म माझा असा जात आहे.
कसा दोष देऊ ? जगाला तरी मी;
उन्हाळाच माझ्या नशिबात आहे.
पुन्हा जातवारी करू आज आता;
इथे बेइमानी नवी जात आहे.
जरी चेक नाही इथे बादशाला;
तरी जग म्हणाले तुझी मात आहे.
तिथे लाख त्यांना मिळो मान मोठा;
' दिवाकर ' इथे ही गझल गात आहे.
5.
कशास रोज रोजचे असे इथे मरायचे;
असेच दुःख पोळते इथे किती सहायचे.
करून टाक मोकळे तुझ्या मनात काय ते;
कशास आसवात या घडी घडी भिजायचे.
करू नकोस याचना उगीच ह्या जगापुढे;
भिकारड्या जगास ह्या तुलाच खूप द्यायचे.
घरी अता जरी तुझ्या विचारतील रोज ते;
तसेच सांग तू तिथे मनात जे करायचे.
'दिवाकरास' वाटते तसेच तू करून जा;
मनातलेच साधले असेच गे बघायचे.
6.
गतजन्मीचे पुण्यच माझे मला भेटली कविता-राणी;
तिला भेटण्या आधी होती माझी कविता उदासवाणी.
आली होती एक पाहुणी तिची सांगतो अता कहाणी;
आज जाहली पूर्ण मराठी जरी असे ती कधी इराणी.
रसिक देतसे दाद अशी की मैफिल सगळी रंगत जाते;
घरंदाज अन् चंचलशा या गझलेची मी गातो गाणी.
तिच्यामुळे हे जीवन माझे बदलुन गेले खरे सांगतो;
गझले खातर चार गावचे पिऊन आलो मी ही पाणी.
गझले पायी वेडा मजला ठरवुन गेले लोक येथले;
खरेच सांगा होती का हो अशी माणसे खरी शहाणी.
वृत्तामध्ये रदिफ काफिया अलामतीसह योजत जाणे;
सोपी भाषा सहज बांधणी हीच असे रे तिची निशाणी.
____________________________________________
____________________________________________
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर ( गुजरात )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा