_____________________बदीऊज्जमा बिराजदार_____चार गझला____________


1.

यातनांच्या अशा दाट गर्दीस या,मी खुशीनेच कवटाळले;
चंद्रताऱ्यातल्या जिंदगीला पुन्हा, रोज स्वप्नात कुरवाळले!

संविधानातही एकनिष्ठा नसे, हक्क मागू कुणाला इथे ?
न्यायदानातले पारडे आंधळे, न्याय देताच रक्ताळले!

ना सुखाचा सडा माझिया अंगणी, अंतरी वादळांचा जुलुस;
प्राक्तनांची व्यथा,कामनांची कथा,सांगता लोक चवताळले.

राग आला मला स्थापितांचा जरी, चाड आहे भल्याची कुठे;
पाहिले चेहरे बंडखोरीतले...अन् स्वतःलाच सांभाळले.

गार वाऱ्यात गंधाळला मोगरा, सोबती आसवांचा सडा;
स्तब्ध आहे उभा गोठता अंतरी, शब्द ओठात घायाळले.

नेमका प्रश्न त्यांचा कळेना तरी, शोधतो उत्तरांना सदा;
बेगडी रोजची पोक्त औदार्यता, बेगडी रोजची वादळे!

सूडबुद्धीत का भावना जन्मली, पाहुण्या सारखी साबिरा;
सागरी लाट आली तिथे ही बघा, काठ पेल्यात फेसाळले.

2.

बेगडी ती प्रेम करते तात्पुरते;
पाहते लांबून...हसते तात्पुरते.

चेहरा बघ रोज ती न्याहाळते अन्. 
ओठ दातांनीच मळते तात्पुरते.

दूर ते स्वीकारणे-नाकारणे पण
सांग तू हे काय करते तात्पुरते.

कैद केले मी तिला हृदयात माझ्या;
फक्त तू का नाम जपते तात्पुरते.

चांदण्यावरती कसा ठेऊ भरोसा; 
तेज चंद्राचेच ठरते तात्पुरते.

हाच भास्कर हा शशी अन हेच तारे; 
या जगी येतात नुसते तात्पुरते.

जीवनाच्या शेवटी जे जाणिले मी;
जन्मण्याचे सोंग असते तात्पुरते.

ही गरीबी अन् अमीरी यार साबिर;
एक जाता.. एक उरते तात्पुरते!

3.

श्वास स्पंदने दोघांचेही जगण्याचे वय निघून गेले;
प्रेम असूनी एकदुज्याला वदण्याचे वय निघून गेले.

विरह वेदना लाख संकटे विश्वासाच्या बागेमध्ये;
कशा भावना व्यक्त करू त्या फुलण्याचे वय निघून गेले!

परमेशाची पूजा अर्चा तशीच त्याची पूजा केली;
तिच्याच हृदयी आत्मसमर्पण करण्याचे वय निघून गेले.

सौंदर्याचा मदिरा प्याला फक्त लांबुनी प्राशन केले;
देहामधली अग्नी ज्वाला विझण्याचे वय निघून गेले.

नजरेच्या मधु गंधाने त्या कडाडणाऱ्या विजा अचानक;
चिंब-चिंब त्या आठवणींचे भिजण्याचे वय निघून गेले.

हार-जीत,अडथळे-अडचणी...लाट सुनामी अवचित येते;
आजवरीच्या व्यभिचाराने रडण्याचे वय निघून गेले.

आनंदाचा सुखशांतीचा जीवनातला अखेरचा क्षण;
भूत आणखी भविष्य साबिर बघण्याचे वय निघून गेले!

4.

बेरकी खुलाशांनी,बेगडी दिलाशांनी;
दुर्दशा तुझी केली राजरोस चोरांनी!

कालच्या ऋतूने त्या चोरले हृदय माझे;
घेतले लपेटूनी गार-गार वाऱ्यांनी.

न्यायदान ही खोटे,सत्य संपले जेथे;
जायचे कुठे आता पांगळ्या विचारांनी?

जाळले स्वतःलाही मंद मंद ज्योतींनी;
जन्म मृत्युचे फेरे वेचलेत ज्वालांनी.

जिंदगीस जगताना बेरजा वजा केल्या;
आज मी सुखी आहे कालच्या हिशोबांनी.

खूप लोक जमले हे आज अंतयात्रेला;
सोहळे यशाचे त्या पाहिलेत डोळ्यांनी.

कापला गळा ज्यांनी पण तरी लळा त्यांचा;
गोडवा तरी होता,बोललो न शब्दांनी.

गझल ही कशी झाली, बोल ना जरा 'साबिर',
एक एक शब्दाला, तोलले हजारांनी!
_______________________________
बदीऊज्जमा बिराजदार,
(साबिर सोलापुरी),
"साबिर", १५,प्रियदर्शिनी हाउसिंग सोसायटी,
कुमठा नाका, सोलापूर :४१३००३. महाराष्ट्र (भारत)
भ्रमणध्वनी:०९८९०१७१७०३
email: sabirsolapuri@gmail.com

२ टिप्पण्या: