___________________________अमित वाघ___चार गझला________________


1.

साजणे आरसा तू बघावा किती;
श्वास रोखून त्याने धरावा किती.

वेड तू लावले या चकोरासही;
चंद्र आता तुझ्यावर जळावा किती.

आठवेना स्वत:चा मला चेहरा;
मी तुझा चेहरा आठवावा किती.

काय द्यावा पुरावा तुला आणखी;
हात जळत्या दिव्यावर धरावा किती.

घेतला फक्त मी हात हातामधे;
देह सारा तुझा थरथरावा किती.

2.

अंतरीचे लोचनांनी बोलतो अस्फूट मी;
पण तिला कळतात कोठे हे इशारे रेशमी.

जाळले वाचून त्यांनी वृत्तपत्राला पुन्हा;
बोचली गर्वास त्यांच्या हाय माझी बातमी.

मी बळीराजाप्रमाणे टांगणीला लागतो;
वागणे राणी तुझे आहे किती हे मोसमी?

ही कळेना कोठली माझी अवस्था ईश्वरा;
भोगुनी संन्यस्थ अन् गुंतूनही मी संयमी.

वाकलो नाही म्हणोनी राहिलो मागे सदा;
ते पुढे गेलेत सारे वाकले जे नेहमी.

3.

गावात वंचनेच्या माझा महाल होता;
काखेत दु:ख ज्याच्या तो द्वारपाल होता.

"बदलू कसे स्वतःचे गर्भात लिंग आई..?" 
निष्पाप अर्भकाचा साधा सवाल होता.

बेभान आसवांनी केली अशी कमाई;
आजन्म ठेवलेला ओला रुमाल होता.

गर्भात प्रेत माझ्या निष्पाप अर्भकाचे;
आयुष्य भोगणारा मृत्यू दलाल होता..

कोड्यात संयमाच्या संन्यास हेलकावे;
आसक्त उत्तराचा जेथे सवाल होता.

4.

नको फिरू तू उन्हात तपत्या वणवण पोरी;
तुझीच काया बनते आहे जळतण पोरी.

खोडलेस तू लिहिता लिहिता नाव जरीही;
कसे खोडसी हृदयावरले गोंदण पोरी.

दु:ख लपवले...सांगतात पडलेल्या भेगा;
तरी कितीदा तू सारवते अंगण पोरी.

स्वप्न जेवढे सुंदर तितके कुरूप वास्तव;
पहा स्वप्न तू, सोड पहाणे दरपण पोरी.

घासलेटच्या आणि विषाच्या दिल्या बाटल्या;
काय द्यायचे तुला आणखी आंदण पोरी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा