_____________________सुधीर मुळीक____पाच गझला_________________

 
1.

बेपर्वा जगण्यातुन मी या निष्कर्षाला आलो;
पडू नये हा प्रश्न कुणाला, का जन्माला आलो?

फक्त तुझ्याशी करतो देवा मी माझी बरोबरी;
आपण दोघे कधी कुणाच्या उपयोगाला आलो?

प्रश्न तसाही श्रीमंतांच्या अस्तित्वाचा होता;
उगाच का इतकेजण गरिबाच्या पोटाला आलो!

भरल्या ताटावरही काढावा पोटाला चिमटा;
त्यांनी त्यांची भूक मिटवली;मी उष्ट्याला आलो!

तुकड्या तुकड्यातुनही तू आजन्म राहिलिस माझी;
तुला वगळले तर,मी सगळ्यांच्या वाट्याला आलो.

डोळ्यांच्या काठावर आता काहिच साचत नाही;
कुणास ठाउक दुनियेच्या कुठल्या टोकाला आलो!

नक्की काहीतरी चिरडले चाकाखाली माझ्या; 
कुठे जायचे होते मी कुठल्या गावाला आलो!

2.

शोधला तर त्यातही सुविचार दिसतो;
ज्या दिव्याखाली तुला अंधार दिसतो!

धावला नाहीस देवा संकटांना;
पण प्रसंगाला तुझा आधार दिसतो.

राम लक्ष्मण जानकीला पाहिले की
उर्मिलेचा मोकळा संसार दिसतो!

तू अगोदर वाच या गुलमोहराला;
मग बघूया कोण हिरवागार दिसतो!

पाकळ्यांवर आण तू अलवार काटा...
मग फुलाचा कल्पनाविस्तार दिसतो!

काय बघ लाडात ग्रह फिरलेत माझे;
लाजली म्हणजे तिचा होकार दिसतो.

दृष्ट कवितेनेच काढावी तिची मी; 
खूप कष्टाने असा शृंगार दिसतो.

काढतो आहे हवा भेटेल त्याची;
शेवटी हाही फुगा फुटणार दिसतो!

चार भिंत्तीना भले मी घर म्हणालो;
पण मला घरट्यातही परिवार दिसतो.

3.

राख होताना तरी जाग आली पाहिजे;
या निखा-याची पुन्हा आग झाली पाहिजे!

जा नभा कंटाळलो चांदणे वेचून मी;
आज काळोखात उल्का मिळाली पाहिजे!

पाहुद्या ना काजवाही उजळताना तिला;
तारकांनो आज आभाळ खाली पाहिजे.

माणसा स्वार्थास तू नाव भक्तीचे दिले;
संकटापुरता तुला फक्त वाली पाहिजे!

ईश्वरा रांगेत ये माणसांच्या एकदा;
दर्शनासाठी कशाला दलाली पाहिजे!

यामुळे तर वाहिले आजवर ओझे तुझे;
चार खांद्यांना उद्याची हमाली पाहिजे.

वाजल्या उत्स्फूर्त टाळ्या जरी गर्दीत या 
माणसांच्या आत वर्दळ उडाली पाहिजे.
          
मी भुगोलावर तुझ्या सोडला दावा खरा;
पण तुझा इतिहास मज भोवताली पाहिजे.

आजही इतकीच कळते मला माझी गझल;
शर्थ दुःखाची...सुखे व्यर्थ झाली पाहिजे!

4.

दोघात हजारो मैलांचे अंतर येऊ शकते; 
पण कातरवेळ तुझ्याही दारावर येऊ शकते!

तू आली,नाही आली; दोन्ही वेळा जिवघेण्या;
आता बघुया कुठली वेळ अगोदर येऊ शकते!

शेवटच्या घटकेआधी आलिस तर आहे सुटका;
नंतर या सगळ्याचे नाव तुझ्यावर येऊ शकते.

काय फुलांना सांगू माझ्या पानगळीचा दरवळ;
मी ओघळलो तर डोळ्यातुन अत्तर येऊ शकते!

या डोहाला ठाउक नाही तळ माझ्या डोळ्यांचा;
ही दुनिया बुडेल इतके पाणी वर येऊ शकते!

कुठल्याही सूर्याला मी मावळलो नाही कारण
आय़ुष्याच्या संध्याकाळी उत्तर येऊ शकते.

5.

आंधळा असला तरी विश्वास मी राहू दिला;
तू न श्रद्धेला कधी माझ्या तडा जाऊ दिला!

मी नसेना एकदाही पायरी चढलो तुझी;
लावणा-यांना घरी माझ्या दिवा लावू दिला.

लागलो होतो न जोवर मी तुझ्या रस्त्यावरी;
तू मला माझा तरी पत्ता कुठे लागू दिला?

फारसे काही न झाले त्या गुलाबाचे पुढे;
पाकळ्या झडल्या तरी तो देठ मी वाळू दिला.

ना कधी माझ्या फुलांना तू तुझी ओंजळ दिली;
ना तुझ्या डोळ्यातला काटा मला काढू दिला!

जन्मभर डोळ्यातले प्रतिबिंब कोणी पाहिले?
आरशाला पाहिजे तो चेहरा पाहू दिला.

ऐकला मारेक-यांच्या मिळकतीचा आकडा;
बंद केल्या हालचाली अन् गळा कापू दिला.

शेवटी दगडात राहुन ईश्वरा टिकलास तू; 
अक्षयी आत्म्यास का रे देह टाकाऊ दिला?
____________________________________

२ टिप्पण्या:

  1. सुंदर! हा शेर हृदयाला खोलवर स्पर्शून गेलाः

    राम लक्ष्मण जानकीला पाहिले की
    उर्मिलेचा मोकळा संसार दिसतो!

    किती वेळा राम, लक्ष्मण, जानकी पाहिले आहेत आपण सर्वांनी? पण कविला उर्मिलेची आठवण येते आणी तो सर्वांना ती करून देतो. अणी एक शहारा जातो. वाह सुधीर!

    उत्तर द्याहटवा
  2. काय बघ लाडात ग्रह फिरलेत माझे;
    लाजली म्हणजे तिचा होकार दिसतो.

    दृष्ट कवितेनेच काढावी तिची मी;
    खूप कष्टाने असा शृंगार दिसतो.
    Wahhhhhhhhhhhhh..!!!!!

    उत्तर द्याहटवा