__________________इंद्रजित भीमराव उगले____दोन गझला______________



1.

एक वेगळी गंमत असते एकांताची;
केंव्हा केंव्हा ऐकू येते धून मनाची.

चुकला होता मैत्रीचा तो निर्णय कर्णा,
सुज्ञ मनाने घाई केली प्रतिशोधाची.

रस्त्याच्या बाजूला ज्यांचे अंथरुण नि घर;
त्यांना कुठली खुर्ची असते आरामाची?

माणूस की विदूषक मेला...कळले नाही;
गर्दी होती शोकसभेला हसणा-यांची.

गोड गोजरी दोन मुलं अन सुंदर पत्नी;
तरी कशाला उणीव सलते तू नसल्याची.

निरूत्तराच्या प्रश्नांनाही हाताळावे;
कुठली ना कुठली चावी असते कुलपाची.

2.

जिथे चूक झाली...स्वत:ची निघावी;
नशीबा, तुझी चूक नव्हती,नसावी!

इथे कोण मोठा, कशाने, कितीसा?
जगी फक्त गणना मनुष्यात व्हावी.

खरे बोलतांना किती त्रास होतो;
अशाने उगा बोबडीही वळावी.

समाजात असतो असा एक पाढा;
'मला मान मोठा, प्रतिष्ठा मिळावी!'

'विठू'आज स्वप्नात येतो कुणाच्या;
मला लागलेली समाधी असावी!

कुणाला कुणाचे इथे भान आहे?
कुणाला कुणाची इथे हाक जावी?

जगावे असे संयमी माणसाने;
मना सज्जनाचा! अशी दाद यावी.
______________________________
इंद्रजित भीमराव उगले, बीड
८९८३६४४२३४

1 टिप्पणी: