_______________________निशब्द देव____पाच गझला_______________


1.

एवढा कंटाळलो हेटाळणीला;
हासलो अन् बंद केले पापणीला.

सिद्ध कर दुष्काळ आहे जाणिवांचा;
आसवे येतील मग पडताळणीला.

आठवण होते तुझी हटकून आई;
पाहतो जेंव्हा नभी मी चांदणीला.

सारखे जोडू नको तू हात तेथे;
देव ही कंटाळतो रे मागणीला.

ऐकले की झोप ही चोरीस जाते;
चंद्र आहे ठेवला मी राखणीला.

पांढ-या वस्त्रात दिसले शेत जेंव्हा;
खूप आल्या सांत्वना ओवाळणीला.

तू कशाचे बीज होते पेरलेले;
काढतो जखमाच हल्ली कापणीला.

2.

दु:ख जेंव्हा भरजरी होते;
तू दिल्याची खातरी होते!

मंदिरी मी जात नाही पण
संकटाची…पायरी होते!

जीवनाने शिकविले मजला;
जखम जखमेने बरी होते!

पावसा खेळून जातो तू ;
अन पिकांची मस्करी होते.

घाम बापाचा घरी येतो;
मग चुलीवर भाकरी होते!

3.

मी तुझ्या छायेत दु:खा छान आहे;
खुद्द जखमांचे मला वरदान आहे.

श्वास घेतांना मला कळलेच नाही;
की हवा सुद्धा इथे बेमान आहे.

वाकलो देवापुढे आजन्म मीही
विसरुनी गेलो…मलाही मान आहे.

श्वास घेण्याचे शिळे चालूच चाळे;
भूक जगण्याची किती हैवान आहे.

जीवनाची वाट मी चुकणार नाही;
हेच रस्त्याचे मला वरदान आहे.

बाप जातांना म्हणाला ऐक देवा
वेदनेचा अर्थ स्वाभिमान आहे .

जेवढे माजायचे माजून घे, पण
जीवना,मृत्यू तुझा यजमान आहे!

4.

सरळ साधा अन् कुणाही सारखा;
शुभ्र आहे मी कपाशीसारखा.

काय बोलू मी दग्यावरती तुझ्या?
गोड आहे पुरणपोळीसारखा!

आठवण आलीच ताई जर तुझी;
श्वास मी बांधेन राखी सारखा!

रात्र  नाही येत प्रेमाची कधी;
स्पर्श होतो देहविक्रीसारखा.

एवढ्या जखमा जमा झाल्यात की
मी मला वाटे तिजोरीसारखा.

रूप ते ...अन तोच तेजस्वीपणा
सूर्य दिसतो ना शिवाजीसारखा?

विठ्ठ्ला इतकेच दु:खाला जपा;
जन्म मग वाटेल वारीसारखा.


5.

का असा खेळून जातो काळ एखादा;
रोज दिसतो चेहरा घायाळ एखादा.

नेहमी ती पाहते फोटोत नव-याला;
राहतो नयनी भिजत दुष्काळ एखादा.

जागती खाल्ल्या मिठाला श्वापदे सारी;
गाळतो नेताच येथे लाळ एखादा!

हे खरे का रे तुझ्यासोबत तुकारामा,
पंगतीला येतसे नाठाळ एखादा?

बघत असते वाट आई आश्रमामध्ये  ,
करत असतो रोज टाळाटाळ एखादा.

वाचण्यासाठी कथा ओसाड प्रेमाची;
तू कधी तर श्वास माझा चाळ एखादा.

प्रेम करतो आजही तितकेच आईवर;
अंतरी असणार माझ्या बाळ एखादा. 

खायला उठते सदा शहरातली शांती;
गाव आवडतो मला वाचाळ एखादा!
________________________________

२ टिप्पण्या:

  1. क्लास..क्लास...क्लास.. बस्स..यापेक्षा काय बोलू?
    प्रत्येकच शेर दिलखुलास..वेगळा कशाला मांडू..?
    जियो....

    उत्तर द्याहटवा
  2. आठवण आलीच ताई जर तुझी;
    श्वास मी बांधेन राखी सारखा!
    Wah..............!!!

    उत्तर द्याहटवा