समकालीन उर्दू साहित्यात सुप्रसिध्द लोकप्रिय शायर शहरयार यांनी उर्दू साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.एखादा प्रतिभावंत शायर उर्दू गझल मध्ये किती उच्च स्थानावर पोहोचू शकतो याचे हे एक यथायोग्य उदाहरणच म्हणता येईल. उर्दू साहित्यातील जवळपास सगळेच मोठे साहित्य पुरस्कार मिळालेल्या शहरयार यांना अलिकडल्या वर्षातच साहित्य जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होण्याचा बहूमान प्राप्त झाला आहे. त्यामुळे उर्दू साहित्यात आणि उर्दू शायरीत एक नवा उत्साह संचारला आहे. त्याच बरोबर उर्दू आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये केली जाणारी शायरी आणि शायर यांनाही या गोष्टीतून नवी प्रेरणा आणि नवा आदर्श मिळाला आहे.
उर्दू साहित्यात गझल या साहित्यप्रकाराला ज्ञानपीठ हे समीकरण काही नवीन नाही.या अगोदर हा सन्मान १९९६ मध्ये रघुपती सहाय 'फिराक गोरखपुरी'आणि १९९७ मध्ये अली सरदार जाफरी यांनी प्राप्त केलेला आहे. शहरयार यांच्यामुळे या परंपरेत आणखी भर पडली शहरयार यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या समोर उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
वयाची ७८ वर्षे पूर्ण केलेले मशहूर शायर शहरयार यांचे पूर्ण नांव कुंवर अखलाख मोहम्मद खान असे आहे. त्यांचा जन्म दिनांक १६ जून १९३६ साली उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील एका छोट्याशा आवला गावात झाला होता. त्यांना साहित्य जगतात 'शहरयार' या नावानेच ओळखले जाते. 'शहरयार' या शब्दाचा अर्थ राजा असा ही होतो. त्यांच्या टोपण नावाप्रमाणेच त्यांनी उर्दू साहित्यातील त्यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण बुलंदशहर येथे आणि उच्च शिक्षण अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पूर्ण झाले. १९६१ मध्ये उर्दू मध्ये स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर १९६६ मध्ये अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयात उर्दूचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तेथूनच ते उर्दू विभागाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्तही झाले.
त्यांच्या साहित्य जीवनाची वाटचाल पत्रकारिते पासून सुरू झाली. त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणतात, पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश म्हणजे माझ्या साठी निव्वळ एक योगायोग होता. खरेतर मला यातून बराचसा फायदाच झाला. तसे मला शिक्षक व्हावयाचे होते. पण त्याचं झालं असं की एम.ए. झाल्यानंतर मी बेकार होतो. माझे उस्ताद पद्मविभूषण प्रो. आले अहेमद सुरूर साहेब यांचे 'हमारी जुबान'हे वृत्तपत्र आणि त्रैमासिक उर्दू साहित्यात निघायचे. त्यांनी मला बोलावून घेतले. ह्यापूर्वी मी जेंव्हा एम.ए. ला होतो तेंव्हा एक पाक्षिक काढले होते. 'ग़ालिब' त्याचे नांव होते. त्याचे सहा अंक मी प्रकाशित केले होते. नंतर मी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे मासिक आणि रिसर्च जर्नल 'फिक्रो नजर' चे आठ वर्षांपर्यंत संपादनही केले. त्याचे बरेच विशेषांकही निघाले. मागील दहा वर्षापासून 'शेरो शायरी', 'हिमाकत, या सारखी पत्रिका मी संपादित करतो . आता पर्यंतच्या माझ्या आयुष्याच्या प्रवासात आणि माझ्या साहित्याचा प्रवासात मी कधीही मागे वळून पाहिले नाही.जीवनात जर एखादं वळण आलं तर त्याला खेळकरपणे मी स्वीकारले.मला खूप चांगले आयुष्य लाभले. मला आतापर्यंतच्या जीवन प्रवासात कुठलीच तक्रार करावयाची नाही. म्हणूनच म्हणावसे वाटते -
'नतिजे पर पहूचते है सभी आखिर मे
हासिल-ए-सैर ए जहाँ कुछ नही है हैरानी है'
त्यांच्या या वक्तव्यावरून ते जीवनाला खूप सकारात्मक दृष्टीने पाहत आलेले आपल्या दिसून येतात. त्यामुळेच तर त्यांच्या शायरीत सकारात्मकता दिसून येते. जसे हा एक शेर-
आंधिया आती थी लेकीन कभी ऐसा न हूआ
खौफ के मारे जुदा शाक से पत्ता न हुआ
शहरयार यांच्या घरात वंशपरंपरागत साहित्याशी किंवा शायरीशी संबंध नसतांनाही ते ह्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करू शकले हेही तितकेच महत्वाचे आहे. ह्या बाबत त्यांच्या एका मुलाखतीत ते असे म्हणतात,मी या क्षेत्रात कसा आलो हे माझे मलाच माहिती नाही. मला फक्त इतके माहीत आहे की, मला पोलीस व्हायचं नव्हतं. माझे वडील पोलिस होते.त्यामुळे स्वाभाविकच ते मला सब इन्स्पेक्टर म्हणून एकदम योग्य समजत होते.असंही मुळीच नव्हतं की, पोलीस क्षेत्राशी काही वाईट गोष्टी मी ऐकल्या होत्या. आणि खुद्द माझ्या वडीलांबद्दल मी काही वाईट पाहिल नव्हतं.पोलिस पदाचा गैरवापर करतांना मी त्यांना कधीच पाहिलं नाही. पण का कुणास ठाऊक माझं मन त्या क्षेत्रात जायला तयार नव्हतं. त्यामुळे मी पोलिस भरतीसाठी घरच्यांना नकार दर्शविला. त्याच दिवसांत एक उर्दू शायर खलील-उल-रहेमान आझमी यांची सोबत मला लाभली आणि मी शायरी करू लागलो. ज्या आवेगाने मी हॉकी खेळत होतो त्याच आवेगाने मी शायरी करू लागलो. आणि मी हे आजही मानतो की, खलील उल रहमान आजमी यांचे माझ्या शायरीच्या मागे पायाभूत योगदान आहे.
शहरयार सारखा तरक्की पसंद विचार सरणीचा मशहूर शायर साहित्य क्षेत्रात काहीतरी करायचं असं ठरवून आला नव्हता. त्यांच्या घरचे वातावरणही प्रतिकूल होते.योगायोगाने का होईना पण साहित्य क्षेत्रात त्यांचं संवेदनशील मन आपोआपच रममाण झालेलं दिसून येते. हे सांगतांना त्यांना कसलीही खंत वाटत नाही. त्यांच्या शायरीत वेगळे विचार म्हणजे वेगळा 'अंदाज-ए-बयाँ' दिसतो. प्रभाव अथवा प्रेरणेबद्दल ते म्हणतात,माझ्या साहित्यातील विचारधारा ही कुठून येते मलाच नेमके ठाऊक नाही. कदाचित ती ईश्वरकृपेने सुद्धा येत असेल पण इतकं मात्र मी नेहमी कटाक्षाने पाळत आलो की, जे आतापर्यंत उर्दू शायरीत चालत आलेल्या विचार प्रवाहांना आपल्या शायरीत स्थान दिले नाही. याउलट नव विचारांना मी जास्त महत्व दिलं. काहीतरी वेगळं करायचं,कोणाचीही नक्कल करायची नाही,असं मी ठरवत आलो. असे मी मुद्दामच करीत नाही आणि हो ,माझा कुणी आदर्श किंवा प्रेरणास्थान नाही. पण मी या पंरपरेचा एक अविभाज्य भागसुद्धा आहेच. मी आजही ग़ालिब ला खूप वाचतो आणि त्याच बरोबर
ब-याच समकालीन व नवोदित शायरांचीही शायरी मी नेमाने वाचतो. त्याच बरोबर दुष्यंतकुमार यांनाही मी वाचतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एवढंच की आतापर्यंतच्या शायरांनी जे अगोदर सांगितलं ते टाळायचा मी प्रयत्न केला. मला हे मान्य आहे माझ्या समकालीन खूप चांगले शायर आहेत पण त्यात माझ्या शायरीची वेगळी अशी ओळख आहे.
यावरून आपल्या लक्षात येतं की शहरयार सारखा प्रतिभावंत शायर किती विनम्र आहे; जो आजही आपल्या समकालीन व नवोदित शायरांच्या विचाराचा स्वीकार करतो.पण त्यांच्या विचारांचं अनुकरण मात्र आपल्या शायरीत करीत नाही.स्वतः तरक्कीपसंद शायर असला तरी ग़ालिब सारख्या विश्वविख्यात आणि रिवायती शायराची शायरी आजही वाचतो. आपल्या विचारांना कुणाची प्रेरणा आहे हे त्यांचं त्यांना ठाऊक नाही. कदाचित ईश्वरीकृपेने ते घडत असावं असं ते म्हणतात. ग़ालिबही त्यांच्या गझलेतील शेरात असाच विनम्रपणा व कृतज्ञता देवासमोर व्यक्त करतात-
आते है गैबसे ये मजामी खयाल मे
गालीब सरीर ए खामा नवा ए सरोश है
म्हणजे ग़ालिब म्हणतो की, मी जे माझ्या शायरीतून लोकांना तत्वज्ञान देतो ते मी देत नाही तर माझ्या माध्यमातून खुद्द ईश्वर ते करवून घेतो.
शहरयार यांच्या शायरीचा आणखी एक पैलू म्हणजे उमराव जान, गमन, आणि अंजूमन सारख्या चित्रपटांचे गीतलेखन. याबद्दल ते म्हणतात , माझ्या साहित्यावर गीतलेखनाचा जरूर प्रभाव पडला पण तोही योगायोगानेच. मी चित्रपट गीतलेखन करावे असे काही ठरविले नव्हते. याही क्षेत्रात मी योगायोगानेच पोहोचलो. मी या गोष्टीचा कधीच विचारही केला नव्हता. पण त्यातही मी यशस्वीच ठरलो. ही सर्व ईश्वराची कृपा होय. मी हे मान्य करतो की, आम जनते पर्यंत माझ्या शायरीला पोहोचविण्यास फिल्मी गीतांचे खूप योगदान आहे. त्यातल्या त्यात 'उमराव जान'मधल्या गझलांमुळे मला खूप लोकप्रियता मिळाली. या फिल्मी गीतांमुळेच लोकं माझ्या पुस्तकांपर्यंत पोहोचलेत .त्यातल्या त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझी शायरी उडिया, तामिल, तेलगू सह भारताच्या प्रत्येक प्रादेशिक भाषेत उपलब्ध आहे. देवनागरीत तर माझे एकूण सात संग्रह छापले गेलेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय भाषेत इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन या भाषेत माझ्या शायरीचा अनुवाद उपलब्ध आहे.खरेतर फिल्मी गीत लिहिताना प्रत्येक शायराला अनेक बंधने असतात. प्रसंगानुरूप आपले विचार बंदिस्त करावे लागतात. या सर्व प्रतिकूल वातावरणातही मनोरंजनातून तत्वज्ञान सांभाळून आपले विचार श्रोत्यापर्यंत पोहोचविणे किंवा आपला विचार प्रवाह मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जसाच्या तसाच कायम ठेवणे फार कठीण असतं. शहरयार साहेबांना ते जितक्या सहजपणे साधलं,ते प्रत्येकाला शक्य होत नाही.
भारत आणि भारतातील संस्कृतीबद्दल त्यांना अत्यंत आदर आहे. स्वतंत्र भारताच्या जडण घडणीचे ते एक साक्षीदार आहेत. भारताच्या भावनिक बांधीलकीवर,सर्व धर्म समभावाच्या वागणूकीवर त्यांचा विश्वास आहे. स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण विकासाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान आहे.
शहरयार यांच्या शायरीचा मुख्य विषय तत्वज्ञान आणि प्रेम हा आहे. एक जदीद उर्दू विद्वान शायर म्हणून उर्दू साहित्यात त्यांची ख्याती आहे. त्यांच्या साहित्य रचनेतून त्यांच्या स्वानुभवातून व सततच्या प्रयत्नातून आधुनिक काळाच्या समस्या समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतात. तसेच या काळातील जदीद उर्दू शायरीचा पाया पक्का करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. ज्ञानपीठ मिळण्याअगोदर त्यांना उत्तर प्रदेश उर्दू अकादमी पुरस्कार, दिल्ली उर्दू पुरस्कार, फिराक सन्मान या सारख्या कितीतरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या शिवाय १९७८ साली त्यांच्या उर्दू कविता संग्रह ''ख्वाब का दर बंद है'' ला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले.
शहरयार यांची प्रकाशित पुस्तके खालील प्रमाणे -
इजम ए आजम (१९६५)
सातवा दर (१९६९)
ख्वाब का दर बंद है (१९८७)
दूध की रौशनी (२००३)
शेवटी प्रत्येकालाच कुणाची सोबत जन्मभर पुरत नसते. शेवटी प्रत्येकालाच आपला प्रवास हा एकट्याने तनहा करावा लागतो. म्हणून ते मकत्यात असे म्हणतात -
ऐ अदा और सुनाये तो क्या हाल अपना
उम्र का लंबा सफर तय किया तनहा हमने
लोक म्हणतात की, जीवन खूप मोठं आहे आणि देवाने आपल्याला ते जगण्यासाठी पाठवलयं पण शहरयार साहेबांना याबद्दल थोडी खंत आहे. ते म्हणतात त्यांना जेंव्हा जीवन कसं जगावं हे समजायला लागलं तेंव्हाच ते संपल. म्हणजे जीवन मला कधी भेटलं आणि माझं बोट सोडून केंव्हा निघून गेलं मला कळलंही नाही. त्यामुळे मला जे जीवन लाभलं ते कदाचित एक स्वप्नच असावं अस त्यांना वाटत. म्हणून ते म्हणतात -
कब मिली थी कहा बिछडी थी हमे याद नही
जिंदगी तुझको तो बस ख्वाब मे देखा हमने
प्रेम आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम त्यांच्या शायरीत आपणांस पाहावयास मिळतो. या शिवाय प्रतिकात्मक आणि रूपकात्मक भाषा सौंदर्य कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगून जातो याच एक उदाहरण-
खूब दुनिया है सुरज से रकाबत थी जिन्हे
उनको हासिल किसी दिवार का साया न हुआ
अशा हा आगळा वेगळा शायर अलिकडेच १३ फेब्रुवारी २०१२ ला
हे जग सोडून गेला..आपल्यासाठी त्यांच्या उत्तमोत्तम गझलांचा नजरा मागे ठेऊन....
____________________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा