1.
या जगातुन जात जावी छानपैकी;
माणसे 'माणूस' व्हावी छानपैकी.
या दगडधोंड्यापरी माणूसकीची;
एकदा भक्ती करावी छानपैकी.
दुर्जनांनी किर्तनाचा लाभ घ्यावा;
सज्जनांनी झोप घ्यावी छानपैकी.
बोलल्या शब्दाविना माझ्या प्रियेला,
भावना माझी कळावी छानपैकी.
शेवटी मज भेटूनी गेल्यावरी ती,
अंतयात्रा मग निघावी छानपैकी!
देवधर्माची नशा इतकी भयानक,
त्यापरी दारु चढावी छानपैकी!
2.
थांबणे ज्याला कधी मंजूर नाही;
कोणतेही ध्येय त्याला दूर नाही!
जाळते काळीज तू इतक्या खुबीने;
आग नाही अन् जराही धूर नाही!
भावभक्तीने नको जाळू मला तू;
मी तुझ्या ताटातला कापूर नाही.
तू तशी प्रेमातही कंजूष होती;
तू दिलेले दुःखही भरपूर नाही.
माणसे तर राक्षसापेक्षा भयंकर;
फक्त त्यांचा चेहरा भेसूर नाही.
3.
लाखवेळा मंदिरी माथा रगड;
पावले नाही कुणालाही दगड.
या जगाची सांत्वने बहिरी-मुकी;
तू किती मोठा गळा काढून रड!
वेदना होईल बघ फुलपाखरु;
एकवेळा फक्त तू प्रेमात पड.
पुस्तकापुरतीच उरली सभ्यता;
बिघडली दुनिया जरा तूही बिघड.
निश्चयाने हात थोडे उंच कर,
मग नभालाही सहजतेने पकड!
माणसांना स्थान दे हृदयामधे,
काळजाचा बंद दरवाजा उघड.
मी पिकातच पाहतो तुज विठ्ठला,
पंढरी येण्या मला नाही सवड.
4.
देव मी या वावराला मानतो;
कष्ट केले की गड्या तो पावतो.
पेरली शेतात मी माणूसकी,
पीक यंदा माणसांचे काढतो!
अष्टगंधासारखी महिमा जिची,
ती चिखलमाती कपाळी लावतो.
दर्शनाला जात नाही मी कधी;
ईश्वराला मी घरी बोलावतो!
पायवाटा मी जगाच्या टाळल्या;
मी पुढे...मागून रस्ता चालतो!
दुःख मजला इष्टमित्रांसारखे;
वेदनेचा सोयरा मी लागतो!
स्वप्न यावे मृत्युही येतो तसा,
तो कधी ठरवून सांगा गाठतो ?
पेटलो मी सरण माझे पेटले;
पण कळेना कोण कोणा जाळतो!
_______________________________
गजानन वाघमारे
कष्टसाध्य, सराफा लेन महागाव
मो.९४२३६१२८७२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा