1.
किती हा चांगला रस्ता मिळाला चालण्यासाठी;
तुझे घर पाहिजे होते इथे रेंगाळण्यासाठी.
नकाशा काढला नाही मनाचा आमच्या कोणी;
किती चालायचे नक्की सिमांना शोधण्यासाठी?
जगाचे कायदे विक्षिप्तसे समजून घे वेड्या;
तुला स्वीकारले आहे...पुन्हा धिक्कारण्यासाठी!
तुझे हे सावरुन जगणे मनाला त्रास का देते?
करत जा हट्ट तू केव्हातरी या चांदण्यांसाठी.
कवडशांच्या दुकानांवर उन्हाचा लाभला पत्ता;
उन्हाला लाच द्यावी का धरा ओलावण्यासाठी?
मला वाचायचे होते पुन्हा माझ्याच ओळींना;
तुला बोलावले नव्हतेच नुसते लाजण्यासाठी!
2.
आशेचा वारा नाही, इच्छांचे वादळ नाही;
या डोहामध्ये आता कुठलीही खळबळ नाही.
दिवसाच्या गर्भामधला हा प्रकाश फसवा दिसतो;
अन् रात्रीच्या डोळ्यांना उरलेले काजळ नाही.
खंबीर कुणी ठरवावे, मी भरीव नाही इतका;
फुंकून सूर उमटावे इतका मी पोकळ नाही.
त्याच्या शब्दांची वाचा गेलेली आहे मित्रा;
ते झाड असे की ज्याच्या पानांची सळसळ नाही.
नात्याला गांभिर्याचा संसर्ग जाहला आहे;
अमुच्यामध्ये कोणीही उरलेले अवखळ नाही.
तुमच्याच स्मृतींच्या दारी मी ठिबकत आहे नुसता,
पण माझ्यापर्यंत माझा आलेला ओघळ नाही.
3.
दुबळे प्रयत्न सगळे झाले करून आता,
जगणे तरी कळेना;पाहू मरून आता!
मी झिंगतोच आहे धुंदीमधे स्वतःच्या;
तू नेहमीप्रमाणे घे सावरून आता.
हृदयातुनी कधीही जमले न काढणे पण
काढून नाव टाकू ओठावरून आता.
खळबळ मनात माझ्या काहीच होत नाही;
वाटेल तेवढे तू घे बावरून आता.
बोलायला कुणाला लावू नकोस काही;
अंदाज घे कळीचा देठावरून आता !
______________________________
सुशांत खुरसाले ,पुणे
मो. नं. 7507269977
खुपच आवडले !
उत्तर द्याहटवा