1.
गंध व्याकुळ चांदणे अन मोगरा फुलणार होता;
भेट होता आपली ती,चंद्र हि लपणार होता.
ते तुला कळतेच सारे शब्द माझे बोलती जे;
घेतला जो मी उसासा तो कुठे कळणार होता.
काय जाणे पावसाचे वैर आहे आसवांशी;
हे जरा दाटुन येता...तो कुठे झरणार होता.
वागतो आहे अताशा सावकारा सारखा जो;
तो तुझा पाऊस तेव्हा केवढा दिलदार होता!
जीवघेण्या शांततेला,भेदणारा हा अबोला;
हाच होता तो इशारा जो मला छळणार होता.
जपुन आहे ठेविला मी,तो ठसाही पावलांचा;
जायची तू वेळ येता, जो मला सलणार होता.
2.
जिन्दगी ही जळे कापरासारखी;
लाभली जी मला वादळासारखी.
पापणीच्या तिच्या मी खरा सोहळा;
लावते ती मला काजळासारखी!
माय माझी जरी गाय आहे खरी;
वाटते पण मला वासरासारखी.
भासतो मी तिला का वसंतापरी?
ती किती बोलते पाखरासारखी!
ये जरा सर्व तू तोडुनी बंधने;
भेट ना तू कधी भेटल्यासारखी.
काय जाणे मनी काय त्यांच्या असे;
बोलती माणसे ओकल्यासारखी.
मागता वेदना आसवांएवढी;
बरसते मजवरी पावसासारखी.
वाचली मी किती,काय झाले भले?
वागली पुस्तके माणसा सारखी.
3.
तू मिळाली वेदनांना...रंग आला सावल्यांना;
हुंदका मी दाबला अन कैद झाली,आसवांना.
भाबडेसे स्वप्न माझे दान केले चांदण्यांना;
का तुझे मग नाव घेता ओल येते पापण्यांना.
चालतांना ना कळे रे...त्रास होतो थांबतांना;
घाव माझे बोलले का रक्त माझे सांडतांना!
प्रश्न जेव्हा लोक पुसतिल पाहता तुज हासतांना;
तू जराशी अडखळावी गूज माझे सांगतांना.
वाट पाहू मी किती हा जन्म सारा भोगतांना?
बघ उसासे घेतले मी,श्वास माझा थांबतांना!
___________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा