1.
ललकारण्या दिशांना उठले तुफान काही;
त्यातील फार थोडे टिकले तुफान काही.
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया;
पोटात सागराच्या घुसले तुफान काही.
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा;
किरणासमान चर्या जगले तुफान काही.
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही;
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही.
उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी,
आभाळ झेलले ते उरले तुफान काही!
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे...
पैकीच माळरानी रुजले तुफान काही.
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते;
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही.
तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही!
घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा;
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही.
होते तिथेच आहे थिजल्या समान काही;
लोळून पायथ्याला निजले तुफान काही.
खेळून धूर्त खेळी, स्वामित्व भोगणारे;
सत्ता रवंथताना विरले तुफान काही.
कक्षेत यौवनाच्या येताच प्रेमभावे;
सौख्यात नांदताना दिसले तुफान काही.
विकण्यास आत्मसत्ता जेव्हा लिलाव झाला;
बोंबीलच्या दराने खपले तुफान काही.
भाषेत गर्जनेच्या आवेश मांडला पण;
किरकोळ आमिषाला फसले तुफान काही!
दिसण्यात शेर होते, दाढीमिशी करारी;
निर्बुद्ध वागण्याने मिटले तुफान काही.
आश्वासने उधळली, सूं-सूं सुसाटतेने;
वचने निभावताना नटले तुफान काही.
मोठ्या महालमाड्या शाबूत राखल्या अन्
उचलून झोपडीला उडले तुफान काही.
ना पाळताच आला आचारधर्म ज्यांना;
गर्तेत लोळताना बुजले तुफान काही.
हकनाक व्यस्त झाले चिंतातुराप्रमाणे;
आव्हान पेलताना दमले तुफान काही.
गल्लीकडून काही दिल्लीकडे निघाले;
मध्येच मुद्रिकेला भुलले तुफान काही.
बसताच एक चटका सोकावल्या उन्हाचा;
पोटात सावलीच्या दडले तुफान काही.
भोगात यज्ञ आणिक कामात मोक्षप्राप्ती;
संतत्व लंघताना चळले तुफान काही!
पूर्वेकडून आले, गेलेत दक्षिणेला;
फुसकाच बार त्यांचा...कसले तुफान काही?
सत्तारुपी बयेचा न्याराच स्वाद भारी;
आकंठ चाखण्याला झुरले तुफान काही.
आरंभशूर योद्धे दिसले जरी ’अभय’ ते
गोंजारताच अख्खे निवले तुफान काही!
2.
लपेटून फासामधी कायद्याला;
ससे वाकुल्या दावती पारध्याला.
नको पाडसा आज कळपास सोडू;
चुल्हा तप्त टपला तुला रांधण्याला.
जवानीत होता उतावीळ श्रावण;
अता फागही ना विचारीत त्याला.
तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे;
कुणी येत नाही मढे मोजण्याला.
करा की नका काम...कोणी पुसेना;
बिले चोख ठेवा...लुटा आंधळ्याला;
इथे देवळाच्या चिखल भोवताली;
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला!
3.
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे;
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे.
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे;
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे.
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी;
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे.
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे;
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे.
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी;
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या;
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे.
अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला;
करतात आत्महत्या का देश पोसणारे?
मस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या;
करतील आमरस्ता मागून चालणारे!
देतो 'अभय' कशाला भगवंत या पिलांना;
शेतीस काळ ठरती, शेतीत जन्मणारे!
4.
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये;
गाभुळलेल्या शिवारास यंदा आग लावू नये.
एवढ्यासाठीच जोपासतात ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या तडा जाऊ नये.
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल;
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये!
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?...
की माझ्या नांगराला एक पण देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ या सारस्वतांवर...
की उंदीरही ज्ञानपीठाचे,पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही;
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये.
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक लक्षात ठेव तू:
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये!
5.
सांगा कशी फुलावी तोर्यात कास्तकारी;
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी!
देशात जा कुठेही,भागात कोणत्याही;
सर्वत्र सत्य एकच- तोट्यात कास्तकारी!
झिजतात रोज येथे तिन्ही पिढ्या तरी पण
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी!
कांदा हवा गुलाबी स्वस्तात इंडियाला;
जावो जरी भले मग ढोड्यात कास्तकारी.
पोसून राजबिंडे,आलू समान नेते;
उत्पादकास नेते खड्ड्यात कास्तकारी.
डॉलर सुकाळ शेती, बारामती-अमेठी;
ती तांबड्या दिव्याची अज्ञात कास्तकारी.
हे बोलणेच आता हा नाइलाज उरला...
की सोड ’अभय’ एका झटक्यात कास्तकारी!
______________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा