1.
कबूल आहे नसायचो मी घरात बाळा;
असायचा मात्र जीव माझा तुझ्यात बाळा.
अपूर्ण राहू नये तुझी कोणतीच इच्छा;
म्हणून राहायचो जुन्याशा बुटात बाळा.
तुझ्याचसाठी करायचो कष्ट एवढे मी;
भुलून गेलास सर्व एका क्षणात बाळा.
तुला जरी वाटतोय रे मी नकोनकोसा;
सदैव तू राहशील माझ्या मनात बाळा.
"सुखात राहा सदैव तू" हीच एक इच्छा;
कसाबसा मी जगेल वृद्धाश्रमात बाळा.
2.
इजा जाम झाली तुलाही,मलाही;
तरी मौज आली तुलाही,मलाही.
तिचे एवढे हाल झालेत की ती,
'कसाई' म्हणाली तुलाही,मलाही.
किती काळ गेला तरी वेढुनी त्या;
प्रथा आणि चाली तुलाही,मलाही.
इथे भेकडांची उभी फौज आहे;
नकोशा मशाली तुलाही,मलाही.
"मुलांनो, जपा पोसणाऱ्या भुमीला"
धरा साद घाली तुलाही,मलाही.
पुरेपूर घ्यावी मजा जिंदगीची;
जराशी मिळाली तुलाही,मलाही.
स्वतःच्या नशीबास आकार देऊ;
अता कोण वाली तुलाही,मलाही?
3.
येई झुळूक अन मन वा-यासवे झुले;
स्मृति जागती अशा, जैशी बहरती फुले.
समजू नकोस गं, अबला या जगात तू;
धरती तुझीच अन बघ हे गगनही खुले.
कार्टून्सच्या जगी रमण्याऐवजी जरा;
न्याहाळतील का चांदोबास ही मुले?
आई-वडील तर कामावरच दिवसभर;
हितगुज कसे बरे मग करणार सानुले?
मोहात ना कधी माझा जीव गुंतला;
हे शब्द सोबती बाकी काय आपुले ?
______________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा