1.
वाट काट्यांची निरंतर चाललो मी;
मग कुठे गावी फुलांच्या पोचलो मी.
पाहुनी दंग्यातल्या उध्वस्त वस्त्या;
मानवी जन्मात येउन लाजलो मी.
रोज घेते शोध माझा जिंदगी पण
आजवर कोठे तिलाही गावलो मी.
मंजिली राहून गेल्या पार मागे;
आंधळ्या कैफात ऐसा धावलो मी.
जिंकुनी ओशाळला खुद जिंकणारा;
डाव तो इतक्या खुबीने हारलो मी!
2.
जीवनाला लागलेला शाप होतो;
मोकळे रडता न आले बाप होतो.
मैफिलीने टाळले ज्याला निरंतर,
यार मी तो बेसुरा आलाप होतो.
नेमकी वाट्यास मज फाशीच आली
दोष माझा हाच की निष्पाप होतो!
आडवी आली तिथेही जात माझी;
नेहमी जेथे खरा इन्साफ होतो.
काढता आलाच नाही जो कुणावर;
मी फकीराचा असा संताप होतो!
3.
वाटणी तू खुशाल कर भाई;
पण मला वाटणीत दे आई!
प्राण बाकी असूनही नयनी;
कां मला जाळण्या अशी घाई?
रक्तबंबाळ आसमंती या...
गौतमा ओतरे निळी शाई!
त्यागले स्वत्व या नद्यांनी अन्
लाभली सागरास पुण्याई.
माय बापास आश्रमी सोडुन...
छान झालास यार उतराई!
__________________________
मसूद पटेल,९६०४६५३३२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा