1.
जन्मते माझ्याबरोबर वेदना;
राहते आजन्म सहचर वेदना.
मी सुखांशी थाटतो संसार पण
प्रेयसी असते खरेतर वेदना!
तू तिथे दगडात,मी चेतन इथे;
हे तुझ्या माझ्यात अंतर...वेदना.
वेदनेचा वंश वाढावा किती ?
नेहमी असते गरोदर वेदना.
प्रश्न साधा : का जगावे वाटते?
फक्त आहे एक उत्तर : वेदना!
चेहरा का पांढरा पडला असा?
कोरली कोणी नभावर वेदना?
2.
वेश्यागृहात व्हावा की मंदिरात व्हावा;
कुठल्या फुलास असतो मृत्यो तुझा सुगावा.
एकेक अक्षराने केलेत घात इतके...
इतिहास खुद्द आहे मित्रा इथे पुरावा.
पाणी कमी दिल्याने चिरतात सर्व भिंती;
शिंपून प्रेम थोडे हृदयास कर गिलावा.
पैसा कमावण्याला माणूस धावताना;
वात्सल्य प्रेम सरते अन् वाढतो दुरावा.
ही एवढी अपेक्षा काळोखल्या पिढ्यांची-
गर्भारल्या भविष्या...जन्मा प्रकाश यावा.
कुठलाच देव आता बहुधा नसेल भोळा;
भगवंत मनगटाचा मजला प्रसन्न व्हावा!
3.
कशास देवा दिलास मजला,हा प्रेमाचा जहरी प्याला;
तसा बरा मी मजेत होतो...गळ्यात आली ही वरमाला!
कसा घ्यायचा श्वास इथे मी,हवाच इथली फितूर आहे;
मला वाटले जरा जगावे...लगेच वार्ता कशी यमाला?
सखे कितीही प्रयत्न केला,विधिलिखीत का टळले कोणा?
दोन किनारी...दोघे आपण...व्यथा माहिती या पाण्याला!
चारा, तोफा आणि कोळसा कशी भुतावळ हपापलेली?
कुपोषणाने मरते जनता,अजीर्ण होते अन् राजाला!
असे वाटते मला उगाचच चंद्र पाहता तो पुनवेचा...
असे सखीने यावे जवळी...अशी जाग यावी प्रणयाला.
नको विठ्ठला मला दाखवू तुझी पंढरी...तुझी द्वारका;
इथे वसे ती घरात माझ्या...सदा पूजितो मातपित्याला!
4.
अटळ दुःख हे...आसवे या पुसू;
जरा गोड बोलू,जरासे हसू!
किती क्षीण झाली बघा काळजी;
तिच्याही जरासे उशाशी बसू.
असा वेदनेचा जिव्हाळा जिवा;
तिला टाळता लागते हे रुसू.
सख्या घे जगूनी जसे पाहिजे;
उद्या ना भरोसा...असू वा नसू.
कसे यार सारे मिळाले असे;
पहाडापरी कोण,कोणी तसू!
जसा भृंग भेटे फुलाला कुणी
तसे लागते ते निराळे दिसू!
मला शब्द हे वाटती लेकरे...
कुणा जोजवू...मी कुणा खेकसू?
शहर बेगडी हे नको वाटते;
चला गावच्या त्या जमीनी कसू!
______________________________
प्रशांत गजानन पोरे,
१८, बी विंग, काकडे रेसिडेन्सी,
चिंचवड स्टेशन,
पुणे - १९
संपर्क : ९६८९९०९१९९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा