1.
शहरात हा असा का अंधार दाटलेला?
सर्वोदयी युगाचा का सूर्य झाकलेला!
कोठे तरी मिळावा नजरेस या दिलासा;
डोळ्यात वेदनांचा नासूर जागलेला.
मी कालचाच आहे अन् मार्ग तोच आहे;
बेताल पावले ही की गाव बदललेला?
संस्कार गाडलेले वहिवाट विसरलेली;
देवात दानवांचा संचार जाहलेला.
ते मेघ पावसाळी बेडयात अडकलेले;
ग्रीष्मातल्या उन्हाचा हा दाह पेटलेला.
वाटे कधी सुखाचे जगणे तरी पशुंचे;
व्यभिचार राक्षसांचा...माणूस चिरडलेला!
बर्फाळ जाहले का जे रक्त वाहणारे;
अन्याय पाहुनीही का हात बांधलेला?
गर्भात वाढलो ज्या ते पांग फेडताना;
मातेवरीच आम्ही आसूड ओढलेला.
हे भाग्य थोर तुमचे...आदर्श भारताचा;
तो स्वाभिमान राखा तुम्हास लाभलेला.
2.
मुक्तवेड्या पाखरांची झेप घेऊ एकदा;
वारियाचा वेग मोजू;पंख लेऊ एकदा!
रेखलेले कुंचल्यांनी स्वप्न जे माझे तुझे;
प्राण ओतू स्पंदनांनी,जाग देऊ एकदा.
चंद्र थोडा,भास थोडा,वेचला श्वासातुनी;
पूर्ण होण्या चांदण्यांचा गंध माळू एकदा.
ऐकलेले,वाचलेले,अर्थही मौनातले;
गुंफुनी शब्दात सारे भाव बोलू एकदा.
उतरतीचे ऊन दारी,सार्थकीच्या सावल्या;
श्रांत देव्हारा मनाचा...रिक्त होऊ एकदा.
सूर्य झाले,चंद्र झाले,संपला वासंतही;
मी जसा अन तू जशी तैसेच भाळू एकदा.
आजवर कोषात जपले घाव दोघांनी कसे;
व्यक्त होऊ आसवांनी,चिंब न्हाऊ एकदा!
3.
जेंव्हा तुझ्या स्मृतींचा मी मांडते पसारा;
असतात सांत्वनाला डोळ्यात लाख धारा!
बांधू कसे तयाला वृत्तात अक्षरांच्या;
बेबंद वाहणारा तो मुक्तछंद वारा!
जातात व्यर्थ सारे सगळेच हेलकावे;
लाटेस अर्थ माझ्या देतो तुझा किनारा.
माझी तुझी अताशा स्वप्नात भेट होते;
देतात कैक नजरा नजरांवरी पहारा.
हरले कशी,कितीदा आयुष्य पेलताना;
हा डाव जिंकणा-या दैवास जा विचारा!
शिशिरात जाणिवांचे संवेग गोठती हे;
हलकेच हाक दे तू...दे अंतरी उबारा.
भेगाळल्या भुईच्या नात्यास सांधताना;
केला किती सुखांचा जगण्यावरी उतारा.
येईन डाव हाती पडदा पडेन जेंव्हा;
उमजेल सोंगटयांचा तेंव्हा हिशेब सारा!
________________________________
सौ.योगिता नितिन पाटील
चोपडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा