________________________कविता डवरे___तीन गझला___________________


1.

पकडून हात माझा तो काजवा म्हणाला;
चल दावतो तुला मी सूर्यास्त जाहलेला !

कसले जिणे अताशा झालेय माणसाचे ?
दिसतो वरी सुखस्तू ;आतून छाटलेला !

कुठल्या जुन्या क्षणांचे परतून होय येणे
चरकासवे गतीच्या  माणूस बांधलेला  ! 

अपुल्यात काय आता शिल्लक असावयाचे ?
हरएक वाद आपण उकरून काढलेला !

धग सोसतेय मन हे अजुनी तिच्या चितेचे
अन् तो पिसाटकर्मा मोकाट राहिलेला !

2.

प्रिये ,तुला वसंत हा निवांत वेळ मागतो
 हवेवरी सुगंध धुंद मंद साद घालतो

तिथे तुझ्या कळ्यांवरी बहार येत आगळी
बहार तो तिथे जरी मला इथे खुणावतो

सभोवताल दर्वळे  तुझ्याच कोवळ्या छटा
तुझाच गंध अंतरी धुमारतो ,उधाणतो !

जरी न भेटतो दरोज बोलणे न होतसे 
तुझ्याच स्पर्श जाणिवा पुन्हा पुन्हा शहारतो

निवांत चांदण्यात ,गारव्यात जीव एकटा
तुझ्याच आठवास मी पुन्हा पुन्हा उगाळतो

3.

माणुसकीने जगता आले तरी पुरेसे !
धुपासम दरवळता आले तरी पुरेसे !

ताठ मानेने जगावयाचे कबूल आहे
जरुर तेथे झुकता आले तरी पुरेसे !

खूप वाचले या गोष्टीला अर्थ काय तो?
थोडे मनी ठसवता आले तरी पुरेसे !

सगळे काही मनासारखे होते केव्हा ?
जीवन  असे समजता आले तरी पुरेसे !

किती वेगाने जीवन जाते फिरते आहे 
श्वास घ्यावया बसता आले तरी पुरेसे !
_____________________________________
प्रा कविता डवरे,
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय,  
अमरावती.
मो. 9623327478



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा