_________________________क्रांति____ तीन गझला____________________


1.

संकल्प मोडवेना अन् ध्यास सोसवेना;
हल्ली मलाच माझा सहवास सोसवेना.

फांदीस होत ओझे, देठास भार वाटे;
वाऱ्यासही कळ्यांचा निश्वास सोसवेना.

झटक्यात जायचा तो थांबून जीव राही;
अस्वस्थ भावनांचा गळफास सोसवेना.

जाणीव शब्दवर्खी अन् शब्द मर्मस्पर्शी;
माझीच मांडलेली आरास सोसवेना.

वेड्या वसंतकाळी ग्रीष्मात गुंतले मी;
आता अखंड झरता मधुमास सोसवेना.

वाटे असेल काही अस्तित्व सावलीला;
कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना.

कापून पंख केला उन्माद जायबंदी;
स्वप्नातली भरारी सत्यास सोसवेना.

2.

गुंतून मीच जाते कोशात उत्तरांच्या;
जेव्हा नव्या समस्या होतात उत्तरांच्या.

बिनमोल तेच सारे अनमोल होत गेले;
दे प्रश्न जीवघेणे मोलात उत्तरांच्या!

काही विचारण्याची प्राज्ञा कुठे कुणाची?
वाहून प्रश्न गेले ओघात उत्तरांच्या.

का उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना;
की शब्द कैद झाले ओठांत उत्तरांच्या ?

ती उत्तरे अशी की अस्वस्थ प्रश्न झाले...
चक्रावले, बुडाले डोहात उत्तरांच्या.

उलटून प्रश्नचिन्हे गळ टाकुनी बसावे,
का जन्म घालवावा शोधात उत्तरांच्या ?

त्याला तमा न होती या प्रश्न-उत्तरांची;
माझेच प्रश्न होते मोहात उत्तरांच्या.

वाचून उत्तरांना मी प्रश्नचिन्ह व्हावे;
दडलेत प्रश्न इतके पोटात उत्तरांच्या!

3.

हवेसे वाटणारे बंध फासासारखे झाले;
दिल्याने-घेतल्याने शब्द बाणासारखे झाले. 

तुला बोलायचे होते, मला ऐकायचे होते;
कसा संवाद...जेव्हा मौन वादासारखे झाले?

दिली माझी फुले अन् घेतले काटे तुझे थोडे;
मिळो काही, जमा अन् खर्च आता सारखे झाले.

कुठे मुक्काम त्याचा आणि तो जाई कुण्या गावा;
पुरे आयुष्य त्या वेड्या प्रवाशासारखे झाले.

गुन्हा काहीतरी मोठाच मी केला, कळे तेव्हा;
सग्यांचे वागणे जेव्हा लवादासारखे झाले.

उन्हाळा पावसाचा अन् हिवाळा ताप देणारा;
ऋतू हल्ली तुझ्या-माझ्या स्वभावासारखे झाले.
_______________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा