_______________________स्वामीजी____पाच गझला_________________



1.
जगावेगळे करू म्हणा परि करणे अवघड आहे;
जगात राहुन जगावेगळे जगणे अवघड आहे.
दिसती इमले मिनार सुंदर, कुसर कोरली नक्षी;
जमीन खणुनी भक्कम पाया रचणे अवघड आहे.
उपवासाचा फराळ दुप्पट तरी उपाशी असती;
देवा स्मरुनी त्याच्या सन्निध बसणे अवघड आहे.
गुंतविण्याला मनास त्यावर विस्मरणाचा पडदा;
स्मरणामधली पुसट सावली पुसणे अवघड आहे.
मनात राखेखाली धुमसत किती साठती ठिणग्या;
खुल्या मनाने दुसऱ्यासाठी जळणे अवघड आहे.
इरेस पेटुन स्वत्व पणाला लावत पळता येते,
हट्ट सोडुनी विकल्प निवडत वळणे अवघड आहे.
जगण्यासाठी सुखसोयींचे डोलारे रचलेले;
जपणुक त्यांची करता जीवन जपणे अवघड आहे.
अनन्त असते ध्येयासक्ती भ्रामक इच्छाकांक्षा;
खरे निवडुनी एक नेमके ठरणे अवघड आहे.
लहानमोठ्या लाभासाठी लवून मुजरे करता;
अभिमानाच्या ताठ कण्याचे टिकणे अवघड आहे.
दुसऱ्यासाठी झिजून मरण्याचे का कौतुक करता?
सगळे त्यागुनिया एकाकी असणे अवघड आहे.
2.

यंत्रे आली तरी भुकेला घास पिकवितो मळा आजही;
किती सावली केली तरिही तिथे उन्हाच्या झळा आजही.
दोन पावले पुरुषापुढती टाकत सबला म्हणुन मिरवते;
स्त्री म्हणवाया सहन कराव्या प्रसवकाळच्या कळा आजही.
परिस्थितीच्या जाचापुढती दुर्मुखलेले असाल किंवा
विरक्त असला तरी चिमुकले बाळ लावते लळा आजही.
कुणी खेळती संगणकाशी, कुणा खिरापत म्हणून मिळतो;
गावाकडच्या मुळाक्षरांना गिरवी फुटका फळा आजही.
किती संग्रहासाठी पळणे ? सिकंदराचे हात रिकामे;
यती म्हणतसे, श्वास कितीसे ? उशीर कसला ? वळा आजही.
ㅤ3.

गोष्टीमधले कासव उर्मट, सशास चिडवुन हसे आजही;
म्हणुन बिचारे सराव करती हिरमुसलेले ससे आजही.
दूध पिताना तोंड भाजले म्हणून घेतो जरी काळजी;
फुंकुन प्यालो ताक कितीही, मनात दहशत असे आजही.
होते पूर्वज थोर शूर अन्‌ जिंकत गेले भल्या लढाया;
केवळ त्यांचे वंशज म्हणुनी तुम्हीच मोठे कसे आजही?
भरती येता पुसून जाणे, क्षणभंगुर हे जिणे नशीबी;
तरी मनाला भुरळ घालती वाळूवरचे ठसे आजही.
पाठ राखण्या कुणी मिळेना, शर्थ करावी एकांड्याने;
दैवापुढती कर्ण बापुडा, चाक रथाचे धसे आजही.
आकर्षक जरि रूप जगाचे, दिसते तितके असते फसवे;
’नकोच गुंता’ यती म्हणतसे, मनात गफलत नसे आजही!

ㅤ4.

स्मरणामधुनी अनेक बाबी पुसणे नक्की;
आठव येता अंधारातच जळणे नक्की.
दिवसभराच्या चाकोरीतुन दमले कोणी;
कट्ट्यावरती मैफिल त्यांची जमणे नक्की.
दिवाणखान्यामधे वल्गना किती मारता?
थोडा अवघड प्रसंग येता पळणे नक्की.
नकली वातावरणामधले झकपक कपडे;
खुल्या निसर्गाला कवटाळा, मळणे नक्की.
जीव द्यावया जलाशयाची खोली गाठा;
मेल्यावरती त्या पाण्यावर तरणे नक्की.
किती आवरा दुसऱ्यापुढती अश्रू अपुले;
एकटेपणी चुकार कोणी ढळणे नक्की.
5.

’तुम्ही माझे जिव्हाळ्याचे’ असे मी मानले होते;
दुरावा वाढण्यामागे कुणाचे साधले होते?
विषारी ही हवा आहे, सुकावा श्वास कंठाशी;
विसरलो, मीच सापाच्या पिलांना पाळले होते.
लपू शकणार ना चोरी कधी नजरेतली त्यांच्या;
जरी त्यांनी विवादाचे पुरावे जाळले होते.
तुझे वारे, तुझ्या लाटा, सुकाणूही तुझ्या हाती;
किनारा मीच निवडावा असे का वाटले होते?
भले तू आज विरहाचा दिलेला शाप मी जगतो;
कधी माझ्याच हातांना गळा तू माळले होते.
तुझी चाहूल आल्यावर कधी विचलीत ना होणे;
असे माझे मला कितिदा वचन मी तोडले होते.
ㅤ_________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा