__________________डॉ.कैलास गायकवाड___पाच गझला____________


1.

कातरवेळी दु:ख दाटते...'तिकडे' नकळत जातो;
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो.

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे;
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो.

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले;
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती;
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो.

किती जरी तू लांबवशिल 'कैलास' वेळ 'नसण्याची';
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो.


2.

जगासारखे वागुन हल्ली भागत नाही;
रात्री झोपत नाही दिवसा जागत नाही.

खंत कशी करणार बदलणा-या दुनियेची;
मी सुद्धा माझ्यागत हल्ली वागत नाही.

आप्त मित्र स्वकियांचे वर्तन सांगून गेले;
येथे काही कुणी कुणाचा लागत नाही.

दु:ख वेदना विरह आसवे हळहळ चिंता;
ते सुद्धा देतो तू जे मी मागत नाही.

तुला कधी जमणार अशी कैलास' विरक्ती;
दु:ख न गेल्याचे आल्याचे स्वागत नाही.

3. 

प्रार्थनेस काय ढोल पाहिजे;
पोचला नभात बोल पाहिजे.

चेह-यावरील दु:ख मोजण्या;
घाव काळजात खोल पाहिजे.

धाय मोकलीत आसवे नको;
फक्त पापणीत ओल पाहिजे.

दोर काचतोय जीवना तुझा;
सावरावयास तोल पाहिजे.

बोल कागदावरी हवा तसा;
एरवी कवी अबोल पाहिजे.


4. 

पूर्वजांनी सोसलेला जाच आठवतो;
वेद म्हटले की मला रेडाच आठवतो.

क्रूर सामूहीक अत्याचार होताना,
द्रौपदीला भेटलेले पाच आठवतो!

अल्पभूधारक बनुन शेतात कसताना,
वामनाच्या पावलाची टाच आठवतो.

उच्च ना, ना नीच कोणी वाचल्यानंतर
खैरलांजीतील नंगानाच आठवतो!

कोण हा 'कैलास'वावरतो शहाण्यागत;
पाहता त्याला मला वेडाच आठवतो.


5.

जरी मोठा न आवाका जिवाला आव मोठा दे;
( नको छोटे शहर वसण्याकरीता गाव मोठा दे.)

शिकस्तीने जराशा जाहले हतबल जगज्जेते;
पराभव काय असतो जाणण्या पाडाव मोठा दे.

नको टोचूस वारंवार जखमाही दिसत नाहित;
जगाला दावण्यासाठी तरी तू घाव मोठा दे.

कसा सल काळजामधला कुण्या ओळीमधे मांडू;
लिहाया वेदना सारी पुरेसा ताव मोठा दे.

पुरे झालीत सारी आडवळणे जीवनामधली;
सहल संपायला रस्ता जरा भरधाव मोठा दे.

कधी जिंकायचा ''कैलास'' नाही,जाणतो आहे;
पराभुत व्हायच्या साठी तरी तू डाव मोठा दे.
______________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा