1.
त्राण नाही जागत्या प्रेतात आता;
माणसाच्या हिंडतो वेषात आता.
कोण जाणे कोण या श्वासात होते;
वाहते ते रोज या रक्तात आता.
पापण्यांशी पूर का हे आसवांचे;
फाटते काळीज हे देहात आता.
काल तू बोलून गेली बोलताना;
जागजागी बोल ते भासात आता.
काढली या पावसाची खोड कोणी;
राग जावो, दाट ना शेतात आता.
2.
वैर आहे कोणते रे ह्या नभाशी सांग ना?
कोणते ढग साचलेले ह्या उराशी सांग ना?
हाय एकांती मनी या दाटतो कल्लोळ बघ;
कोणती ही वेदना छळते तळाशी सांग ना?
मी मला शोधून थकलो सापडेना आज ही;
का पटेना नेमके रे ह्या मनाशी सांग ना?
संधिकाली होत जातो मी असा घनदाट बघ;
कोणते नाते असावे ह्या तमाशी सांग ना?
रोज रात्री आसवांनी छेडतो मी भैरवी
थांबवावे त्यांस कोणी ह्या उशाशी सांग ना?
वादळाला तोंड द्यावे ह्या जहाजाने कसे?
तूच होती तूच ना माझी खलाशी सांग ना?
3.
राग होता कोणता गाणार आता;
पावसा रे चिंब गा मल्हार आता.
सावळा हा कोण रात्री रोज दाटे;
कोण आहे या इथे आधार आता?
काढले मोडीत माझे दु:ख पूर्वी;
मांडला कोणी इथे बाजार आता?
फार झाल्या आत माझ्या खोल जखमा;
मानली मी आज माझी हार आता.
नेहमी माझे उन्हाला सांगणे हे;
पावलाला सावलीचा भार आता.
दूर देशी, दूर गावी जा निघोनी;
मानतो मी खूपदा आभार आता.
____________________________
Very nice Sripaad
उत्तर द्याहटवाWe are your fans... Coolers.. Acs..