1.
घर, गाव आठवून उसासून झोपलो;
अंधार काळजास लपेटून झोपलो.
स्वप्ने पुन्हा नवीन उशाजवळ घेतली;
इच्छा जुन्या मनात उगाळून झोपलो.
गप्पा करीत भूक कितीवेळ जागली;
मग मी खिसे उगाच तपासून झोपलो.
एकांत पांघरून कुठे नीज लागते!
मी दुष्ट आठवांस दटावून झोपलो.
जे थापटायचे, न अता हात राहिले;
* शहाण्या मुलासमान स्वत:हून झोपलो.
पोलीस मार देत विचारीत राहिला;
फुटपाथवर कुणास विचारून झोपलो.
जेथून उठवणार कधी ना कुणी मला;
थडग्यात मी अखेर सुखावून झोपलो.
(* शहाण्या या शब्दाच्या उच्चारी 4 मात्रा घेतल्या आहेत.)
2.
कळाले मला तू सरोगेट आई;
किती लावला सांग ना रेट आई.
किती काळजी गं तुला कातडीची;
कधी आतड्यापासुनी भेट आई.
हवी कागदाची विमाने नि होड्या;
कुठे मागतो गिफ्ट रॉकेट आई?
तुझे ते करीयर नि शूटिंग, दौरे;
किती काळ नाही गळाभेट आई!
तुझ्या गोधडीची हवी ऊब मजला;
तुला प्रिय पण 'रेड कार्पेट' आई.
खरे एक आयुष्य, 'रीटेक' नाही;
न येई पुन्हा लावता 'सेट' आई.
3.
ताण, चिंता, कटकटींची सारखी रिपरीप देवा;
शब्द पेरायास आता दे जरा उघडीप देवा.
जिंदगी गळतेच आहे नेमकी कोठे कळेना;
सांग फुटलेला कुठे रे नेमका पाईप देवा?
रात्रिच्या ओठातली मी शांतता प्राशीत होतो;
सायरन मारीत आली पोलिसांची जीप देवा.
तू तरी अंधार कोठे दूर केला जीवनाचा?
मी तरी लावू कशाला रोज नंदादीप देवा?
तू कुठे बिनशर्त सारी जिंदगी केली हवाली ?
जाचणाऱ्या नियमअटींची ठेवली तळटीप देवा.
4.
आकाश लांघण्याचा हा चंग कावळ्यांचा;
घरट्यात चाललेला व्यासंग कावळ्यांचा.
होण्यास 'मुख्यमंत्री' सर्वात कोण काळा;
जोरात चाललेला वादंग कावळ्यांचा.
हंसाबरोबरीचा आटापिटा कशाला;
बदलेल साबणाने का रंग कावळ्यांचा.
मैफील रंगलेली कर्कश्श गायनाची;
कोकीळतान येता रसभंग कावळ्यांचा.
शिवणे असे जरीही आम्हा निषिद्ध त्यांचे
पण पिंड हे शिवाया 'सत्संग' कावळ्यांचा!
_________________________________
पत्ता : ब-150, सोपाननगर, सासवड,
ता. पुरंदर, जि. पुणे 412 301
मोबाईल : 9890811567
अभिनंदन ...अभिनंदन
उत्तर द्याहटवा---आगे बढो
थँक्स काका
उत्तर द्याहटवा