1.
आमुच्या या वेदनांवर चालु दे त्यांची दुकाने;
कोरडा चतकोर माझा दे मला खाऊ सुखाने.
मागल्या वर्षीच गेल्या झोपड्या वाहून अमुच्या;
माणसे नेली पुन्हा वाहून यंदाच्या पुराने!
टाकली ती बिस्किटे नी औषधे त्यांनी वरूनी...
घालुनी घिरट्या परत ती चालली त्यांची विमाने.
घेतली त्यांनी छबी डोळेच ते पाणावतांना...
छापले ते वृत्त त्यांनी पृष्ठभागी आग्रहाने!
घेतले ते शेत त्यांनी टाकुनी दिडक्या समोरी
आणि विकले जमिनदारांना पुन्हा चढत्या दराने.
आमच्या अश्रूंवरी पिकते तयांचे शेत सारे;
घालतो आम्हीच त्यांना का मते मग आदराने.
2.
सारखे ध्यानीमनी हे जीवनाचे भास का?
काळजाला फासळ्यांचा कुंद कारावास का?
ते किती त्या पाखरांचे स्वैर असते विहरणे;
का इथे या बंधनांचा जीवनी या फास का?
कष्ट कोणाला न चुकले मी जरी हे मानतो;
श्रेय कोणाचे?कुण्या भलत्या मुखी तो घास का?
मी किती समजूत काढू सांग तू आता तुझी;
चेह-यावर आसवांची नेहमी आरास का?
भोगल्या सा-या क्षणांचा मी करू ताळा कसा?
जीवना सारे कसे चुकले तुझे अदमास का?
नाचलो तालावरी मी जिंदगी तुझिया परी
दावला ना तू मला तो एकही मधुमास का?
______________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा