_____________________शिवाजी सावंत____तीन गझला_______________



1.

जे वाटले घडावे, घडले न यार काही;
हरण्यास डाव आता उरले न यार काही.

शिखरास गाठण्याचा केला विचार जेव्हा;
तोडून नाळ निघणे रुचले न यार काही. 

मी मूठ खळखळावुन वळवून टाकलेली; 
फासे हवे तसे मज वळले न यार काही. 

नाही म्हणू कशाला...स्वप्नात दंगलो मी;
पण नेत्र वास्तवाचे मिटले न यार काही. 

''जा घे तुला'' म्हणालो,"ही कवचकुंडलेही";
मी याचकास दुसरे पुसले न यार काही. 

भरधाव सोडलेला घोडा अडून गेला; 
थोडे वळून घ्यावे, जमले न यार काही. 

2.

रातीस जागण्याला त्यांचा नकार आहे;
डोळे नि पापण्यांचा झाला करार आहे. 

एकेक होत सा-या उल्का लयास गेल्या; 
खेळात हारलेला तो हा जुगार आहे. 

हातास गुंफताना पायात पाय नेले;
एकी करावयाचा खासा प्रचार आहे. 

बुंध्यास छाटलेल्या फुटले नवे धुमारे;
या काळजास झाला येथेच वार आहे. 

सोने चकाकले ते,आगीत पोळले जे; 
सूर्यास जोखण्याचा अंगी थरार आहे. 

रक्तातुनी निघावा लाव्हा उफाळलेला;
त्याच्यावरीच आता सारी मदार आहे. 

नाही म्हणावयाला माझे मला कळाले;
मी पाय रोवले अन मृत्यू पसार आहे. 

3.

डोळे सुकून गेले, पोटात आग आहे;
हातास काम नाही,डोक्यात राग आहे. 

माझा मलाच ऐकू आवाज येत नाही;
यंत्रात कोंबली मी आधीच जाग आहे. 

पाठात पुस्तकाच्या 'शेतीप्रधान' होते. 
आता न अक्षरे ती,नुसताच डाग आहे!

वाटून घेतलेली सत्ता-जमीन ज्यांनी;
त्यांचेच राजवाडे,त्यांचीच बाग आहे. 

माझा म्हणावयाला आहेच देश कोठे? 
तुकड्यात कापलेला प्रत्येक भाग आहे. 
_________________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा