1.
परिस्थितीने फक्त ते लाचार झाले;
पेटणारे रक्त थोडे गार झाले.
ही कमाई खूप झाली जीवनाची;
राहण्यासाठी मला घरदार झाले.
घट्ट केली मी मुळे मातीत तेव्हा...
जीवनाचे झाड हिरवेगार झाले!
मंदिराच्या पायरीवर झोपलो पण
देव सारे आतले अंगार झाले.
आैषधाचा दोष नाही यात काही;
जीव घेणारे किती आजार झाले.
हा किती मोठेपणा सांगू फुलांचा-
जाळल्या बागा तरिहि ते हार झाले!
2.
पोरांसाठी सुट्टी झालो;
पुस्तकातल्या गोष्टी झालो.
किती निरागस हसला मुलगा...
खेळण्यातली शिट्टी झालो!
बालपणीचा प्रेम राग हा :
दोस्ती झालो...कट्टी झालो!
हतबल झाली आई तेव्हा,
जेव्हा जेव्हा हट्टी झालो.
गळले नाही मडके माझे;
वेळोवेळी भट्टी झालो!
3.
प्रश्न आमचे सुटले नाही;
पेटुन कोणी उठले नाही!
इच्छा माझ्या हजार होत्या...
तितके तारे तुटले नाही!
मणी,डोरले,कुंकू गेले;
कर्ज आणखी फिटले नाही!
देव धावले अंगावरती;
सुतक म्हणालो फिटले नाही.
शाळा,पुस्तक,पाट्या रडल्या...
बंदुक हाती...पटले नाही!
मेल्यावरही वाट पाहिली;
डोळे सुद्धा मिटले नाही.
__________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा