_____________________जनार्दन केशव____एक गझल 'गोपाळाची'_____________



यश कुणा मिळते विनासायास गोपाळा ?
जाउनी शिखरावरी हरलास गोपाळा!

का निरंतर वाढतो हा ध्यास गोपाळा ?
माणसाला... केवढा हव्यास गोपाळा!

गोड घ्यावा मानुनी रे आपल्यापुरता;
जेवढा मिळतो सुखाचा घास गोपाळा.

आतली कोंडी कधी बेभान झाली तर
गुदमराया लागतो मग श्वास गोपाळा.

-हास होतो शेवटी सा-याच गोष्टींचा;
तू खरेतर घे अता संन्यास गोपाळा.

बोलणे झाल्यावरी जे बोलणे उरते...
तेच मग देते मनाला त्रास गोपाळा!

चांगला आशय कधी तू मांड एखादा;
अक्षरांची केवढी आरास गोपाळा!

सत्यता पचवायलाही लागते क्षमता;
शेवटी खोटेपणा हा भास गोपाळा!

चांगदेवाची गुरू ठरलीच ना मुक्ता;
दे खरा सन्मान तू ज्ञानास गोपाळा!

जग किती गेले पुढे...तू पाहिले नाही;
तू तुझ्या दुनियेमधे रमलास गोपाळा.

लाभले होते तुलाही वलय सन्मानी;
आखली भवती स्वत: तू आस गोपाळा.

यापुढे कक्षा तुझी सोडू नको बावा;
ग्रहण तुजला लागले खग्रास गोपाळा.

ही तुझी माफी सुशोभित काय कामाची ?
एकदा बोलून तू चुकलास गोपाळा.

मान्य तर आतुन तुला आहे खरे सारे;
त्यामुळे खोटेच पण नमलास गोपाळा.

लागली चाहूल जर भूकंप येण्याची;
सावरावे तू तुझ्या जगतास गोपाळा.

ही अरेरावी तुझी नाही बरी इतकी...
माज बनतो शेवटी... गळफास गोपाळा!

बोलली दुनिया किती बघ आदराने ही;
सभ्यतेची सोडली तू कास गोपाळा.

भांडणाने सुटत नाही प्रश्न कुठलाही;
मानते दुनिया ख-या प्रेमास गोपाळा.

मूळ मुद्दा मी अजुनही बोललो नाही;
जो खरा आहे तुझा इतिहास गोपाळा.

स्वर-अलामत यातले तू गूज समजुन घे;
काफियाचा ना तुला अदमास गोपाळा!

मी न वेलांटी उकारा सारखा कोणी;
तू नको तेथेच का वळलास गोपाळा.

आदराने बोललो कायम तुझ्याशी मी;
पण कमी समजू नको मौनास गोपाळा.

का नवोदीतांप्रमाणे वागतो वेड्या;
बंद कर ना ही तुझी बकवास गोपाळा.

वासरामध्ये शहाणी गाय तैसा तू;
त्रास मग देतोस का गोठ्यास गोपाळा.

ऊंट यावा डोंगराखाली तसे झाले...
ज्येष्ठता विसरून तंतरलास गोपाळा!

हादरा पहिलाच हा बसला तुला आहे;
त्यामुळे ढळला तुझा विश्वास गोपाळा.

सत्य दुनियेला शहाणे करत जाते रे;
पकडले आम्ही तुझ्या कानास गोपाळा.

सर्वकाही ज्येष्ठतेने तोलतो का तू ?
ही नवी पीढी तुझ्याहुन क्लास गोपाळा!

तू जरी दशाकानु-दशके खरडली पाने;
त्यापरी नवखा बरा हमखास गोपाळा.

वंदनीयांच्या समोरी टेकतो माथा;
माननीय राहते नावास गोपाळा.

फोल ठरली भाषणे आता तुझी सारी;
तू न मुद्यावर कधी आलास गोपाळा.

का लहानांनी न सांगाव्या चुका मोठ्या;
वय तसे नसतेच अभ्यासास गोपाळा!

तू धनी झाला चुकांचा पाहते दुनिया;
उर्मटासम व्यर्थ बडबडलास गोपाळा.

खूप तू केली फसवणूक शब्दब्रह्माची...
भोग आता यापुढे वनवास गोपाळा!

का स्वयंभू जाहल्याच्या वल्गना करतो;
पावतो तर दगडही नवसास गोपाळा.

कूपमंडुक जाहला आहेस आता तू;
लाभुदे तुज सागरी सहवास गोपाळा!

घातले शेपुट जसे तू श्वान एखादा;
भूंकण्याआधीच घाबरलास गोपाळा.

तू चुकांचा जेवढा रचलास हा डोंगर;
का न केला तेवढा अभ्यास गोपाळा?

काव्य प्रगती पुस्तकावर तू हुशारच रे;
पण, ग़ज़ल विषयात तू नापास गोपाळा!

रंगली चर्चा ख-या अभ्यासकांमध्ये...
पोपटासम बोलुनी फसलास गोपाळा.

समजतो ज्ञानी स्वत:ला तू जरी मोठा;
एक टीकेनेच गोंधळलास गोपाळा.

लागला आहे सुरुंगच अढळ स्थानाला;
त्याविना का सांग बावरलास गोपाळा.

हा गजलचा मुकुट आहे सख्त काटेरी;
शोभतो कवितेमधे तू खास गोपाळा.

ही तुझी त्रेधा नि तिरपिट का उडाली रे ?
एक चर्चेतच कसा दमलास गोपाळा ?

सारवा सारव कशाला सवलतींची ही ?
मानतो आम्ही ख-या तंत्रास गोपाळा!

सिद्ध कर फिरुनी स्वत:ला तू खरे आता...
दाखले खोटे नको आम्हास गोपाळा.

मान्य कर मोठ्या मनाने तंत्र फसल्याचे;
गजल लिहिताना किती चुकलास गोपाळा!

लाभली नक्षत्रप्रतिभा जर सुगंधी ही;
दरवळो काव्यातला मधुमास गोपाळा.

आकडा छत्तीसचा नाही तुझा माझा;
मी तसा मोठ्या मनाचा दास गोपाळा.

गोजिरे बोलुन फसवले तू जगाला या;
सांग ना सच्चा कुठे उरलास गोपाळा?
________________________________



1 टिप्पणी: