1.
मंदसा वारा मला स्पर्शून गेला की शहारे यायचे;
आठवांच्या मग झळांचे बोचरेपण शांत होउन जायचे.
स्पंदनेही वाहिली तुझियावरी हृदयातली माझ्या सखे;
ती जरा नाजुक, जरा हळवी, तरीही तूच सांभाळायचे.
तूच नव्हती, काळजी नव्हती मलाही काळजाची आजवर;
मात्र आता जे कधी हरलेच नाही त्यासही हरवायचे.
मोहराया लागली की तू तिथे मग मी इथे गंधाळतो;
ये सुगंधी पावले घेऊन अपुले घर तुला फुलवायचे.
वादळे येण्या अगोदरची जणू ही जीवघेणी शांतता;
बोल काही...खूप झाले मौन साधुन हे मला जाळायचे
तू मनाच्या वेदनेलाही कधी हुलकावणी देऊन बघ;
अंतरीच्या रुक्ष पटलावर सुखाचे फूल मग उमलायचे.
2.
संधी साधू नाहिस तू तर अगदी साधा;
पाप घोर असतील पण पामर अगदी साधा.
दिसला नाही घाव तरी पण दुखते मित्रा;
मुका मार तो हृदया भीतर अगदी साधा.
का मी देऊ प्रमाण माझ्या अस्तित्वाचे?
आठवांतही माझा वावर अगदी साधा.
पराक्रमाची गाथा तुमची प्रसिद्ध आहे;
मीही आहे शब्द धुरंधर अगदी साधा.
गिळेल केव्हा तुजला तो कळणारच नाही;
अस्तनीत लपलेला अजगर अगदी साधा.
मनातले सुख घरासही गंधाळत असते;
शिंपुन घ्या मायेचा अत्तर अगदी साधा.
व्यक्तित्व तुझे घडते तुझिया निर्णय क्षमतेने;
शब्द काढ कोषातुन जर-तर अगदी साधा.
3.
जाहली वर्षे हजारो तू कुठे गेलास भक्ता?
देव भक्तीचा भुकेला त्यास का उपवास भक्ता?
फाटक्या ह्या प्राक्तनाला मारता कसली शिलाई?
तोरणेही आसवांची बांधली कळसास भक्ता.
भावनांशी खेळ येथे चालतो दररोज आहे;
फासला शेंदूर की म्हण देव त्या दगडास भक्ता.
एरवी तर मंदिरेही मोकळी दिसतात सारी;
वाढते ती रोज गर्दी पाहण्या बाबास भक्ता.
शोधण्या निघतोस वेड्या देव सा-या भूतलावर;
पाहिले नाहीस का तू माय अन् बापास भक्ता?
काय त्या भोंदूगिरीला पाहुनी मी दंग झालो;
वाढला व्यापार खोटा घेउनी सन्यास भक्ता.
4.
असेल तोवर जगू जिंदगी घडेल तेव्हा घडेल मृत्यू;
दारावरती उभा असूद्या बघून हिम्मत रडेल मृत्यू.
मनी दरवळे सुगंध जेव्हा वाट मखमली क्षणात होते;
काट्यांवरचा प्रवास त्याचा फुलांवरी धडपडेल मृत्यू.
अनंत जन्मी तहानलेला झरा हसूचा मिळे न त्याला;
अंत हासरा असेल तेव्हा जीव स्वत: पाखडेल मृत्यू.
प्रयोजनाचे भाग्य लाभले देह कारणी लागायाला;
सार्थक झाले जन्माचे की तुलाच मग आवडेल मृत्यू.
हृदया मधली अबोल दु:खे मनास हळवे करून जाती;
किती जपावे? भीती आहे वेदनेतही दडेल मृत्यू.
श्वासांच्या अस्तित्वा मध्ये इवल्याशा रेषेचे अंतर;
जरा पावले डगमगली की व्याधी जैसा जडेल मृत्यू.
सुंदर. . खुप छान.
उत्तर द्याहटवाbohot badhiya
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाअप्रतिम....गझलां..
उत्तर द्याहटवा