________________________कमलाकर देसले___तीन गझला________________


1.

नकोच शोधू छापिल उत्तर;
प्रश्नांमध्ये भटकंती कर.

काठीण्याच्या उरात गवसे;
करुणेचा झुळझुळता पाझर.

विषात सुद्धा अमृत असते;
हे प्रतिभेला कळते लवकर. 

मनासारखे घडले कोठे -
कधी कुणाचे इथे आजवर?

विश्वाचा नागरिक होण्या-
पाडुन बघ ते मनातले घर.

मंदिरातला राम, काल बघ;
होता संगमरवरी पत्थर.

खुशाल घे सर्वांशी पंगा;
नकोच पण काळाशी टक्कर.

कधीतरी व्हायला हवा हा;
अभिमानाचा टायर पंक्चर.

हृदयच ज्याने चर्च बनविले;
तोच खरोखर असतो फादर.


2.

भावनांची झाक थोडी ओल बाई;
येथल्या नियमात आता बोल बाई.

ऊन,वारा,पावसाळा झेलणारी;
जाणतो मी जखम आहे खोल बाई.

माय, मैत्रिण,लेक होते बहिण सुद्धा ;
तू किती करशील येथे रोल बाई ?

तू अनिच्छेने स्वत:ला कोंड आता;
चांगला नाहीच हा माहोल बाई.

हासण्याचे घेतले मक्ते तयांनी;
तूच भरते आसवांचा टोल बाई.

वेल घेते हात हाती मांडवाचा;
सोडला की हात...जातो तोल बाई.

हा तुझा मोठेपणा आहे धरेचा; 
तू दिले आहे क्षमेला मोल बाई.

ऐकु ना यावीच किंकाळी तुझी ती;
याचसाठी वाजती ते ढोल बाई.

3.

घातली तू केवढी ही भुरळ आहे;
प्रेमही तितके तुझे हे नितळ आहे.

पाकळ्या नाजूक इतक्या भोवताली;
कैद भ्रमराला अता ही अटळ आहे.

प्रेम म्हणजे पेरणे अन देत जाणे;
पेरल्याने लाभले मज बखळ आहे.

तू नभाहुन वेगळी नाही तरीही;
तूच वार्‍याहून सुद्धा चपळ आहे.

हा तुझा सहवास इतका लाघवी की,
वाटतो अंधार सुद्धा उजळ आहे.

प्रेम करते एवढे माझ्यावरी तू;
वाटते...मी ईश्वराच्या जवळ आहे!
_____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा