1.
तूर्तास ह्या सुखांचा अतिरेक फार झाला;
अन वैभवामुळे ह्या माणूस ठार झाला.
घटली कशी शुभेच्छा तुटला कसा जिव्हाळा-
का जीवनात इतका हा चढउतार झाला?
चिंतेत पाहतो मी घरट्यात पाखरे ही-
का जीव आमचा ह्या दुनियेस भार झाला?
भिजवून आसवांनी बघ धार लावली मी;
भाला उगाच नाही हा टोकदार झाला.
संभाळले असे तू माझ्या घरास येथे;
संसार तुजमुळे हा गुलजार फार झाला.
भेटू जरा गड्यांनो, निष्काम एकमेका;
अपुल्यामधील आता व्यवहार फार झाला.
2.
वेदना आक्रंदुनी ही ठार झाली;
शेवटी ह्या जाणिवांची हार झाली.
कोणता पर्याय आहे या जगाला;
प्रीत जर ना आपला आधार झाली.
का असूनी होत नाही व्यक्त कळकळ-
माणसे ही केवढी लाचार झाली.
दाद द्या मज सोसले हासून सारे;
एक ना इच्छा जरी साकार झाली.
वेगळी सापाहुनी नाहीच दुनिया;
यामुळे माझी गझल ही घार झाली.
झुंजलो आजन्म पाषाणासवे मी,
वाट म्हणुनी पर्वताच्या पार झाली.
ज्यात नव्हती वाटणी ह्या माणसाची;
तीच कविता जीवनाचा सार झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा