'मुक्त पक्षी' माधव जूलियनांची एक उत्कृष्ट प्रेमविषयक गझल_डॉ. अविनाश सांगोलेकर

                                                                                         


 इ.स.१९२० ते १९४० हा कालखंड मराठी कवितेच्या इतिहासात रविकिरण मंडळाच्या नावाने ओळखला जातो. ह्या मंडळाचे प्रमुख सदस्यकवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन (जन्मः इ.स.१८९४, मृत्यूः इ.स.१९३९) हे होत. त्यांनी फार्सी भाषेच्या आपल्या व्यासंगातून मराठीत 'गझल' हा काव्यप्रकार परिचित करून दिला. त्यातून हा काव्यप्रकार लोकप्रिय झाला. शिवाय त्यांनी ह्या काव्यप्रकारातून बरेच काव्यलेखनही केले. 'गज्जलांजलि' (इ.स. १९३३)हा त्यांचा कवितासंग्रह ह्या दृष्टीने पाहण्याजोगा आहे. 'गझल' हा काव्यप्रकार व प्रेमभावना ह्यांचा सांधा बर्‍याच वेळा जुळतो, हे माधव जूलियनांच्या प्रेमभावनापर गझलांधूनही स्पष्ट होते. 'प्रणपढंरीचे वारकरी' अशी उपहासपूर्ण पदवी जी बा. अ. भिडे ह्यांनी माधव जूलियनांना दिली ती त्यांच्या प्रेमभावनापर गझलांचा विचार करूनच!
वरील सर्व बाबींसंदर्भात 'मुक्त पक्षी' ही माधव जूलियनांची प्रेमभावनापर गझल एक उत्कृष्ट प्रातिनिधिक नमुना जरूर म्हणता येते. सात व्दिपदींच्या ह्या  गझलेत प्रेमभंग झालेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून मनोगत सांगितले आहे.  त्याचे हे मनोगत साहजिकच दु:खपूर्ण उद्गारांनी भरलेले व भारावलेलेही आहे. हा प्रियकर स्वतःचा उल्लेख  'नेणता पक्षी' असा करतो, तर प्रेयसीचा उल्लेख 'खुबीने जाळे टाकणारी' असा करतो. हा दृष्टीने पुढील व्दिपदी उद्धृत करण्याजोगी आहे:
''नेणता पक्षी मला पाहूनि तू
भोवती जाळे खुबीने टाकिले.''

ह्या व्दिपदीतून हेही स्पष्ट होते की, प्रियकर हा साधाभोळा, निष्पाप, अजाण असा आहे व त्याला प्रेयसीनेच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले आहे, तेही खुबीने!
प्रेयसीच्या प्रेमरूपी घरात प्रियकर लवकरच रमला. तो स्वातंत्र्यप्रिय असताना, मुक्तपणे जीवन कंठत असताना त्याला ह्या आपल्या जीवनाचे विस्मरण झाले. कारण प्रेयसीने आपल्या प्रेमपाशात त्याला जखडून तर ठेवलेच; परंतु दास्याचे, गुलामगिरीचे धडेही त्याच्या गळी तिने कुशलतेने उतरविले. पुढे हे प्रेमाचे पाश ढिले झाले; तरी तला मुक्त,मोकळे जीवन नकोसे वाटत गेले. तो स्पष्टच म्हणतो,


''मी ममत्वे रंगलो गेही तुझ्या,
 मी न जाई पाश होताही ढिले.''

प्रेयसीशी इतकी एकरूपता झाल्यानंतर तीच प्रेयसी की, जिने प्रियकराला आधी प्रेमाचे वेड लावले होते, ती आता मात्र त्याला वार्‍यावर सोडून स्वत: नामानिराळी झाली आहे. शिवाय ती मानभावीपणाने प्रियकराला म्हणते की, मी मुक्त केले असल्याने तुला हे जग पाचूच्या रानाप्र्रमाणे हिरवेगार व निळ्या आकाशाप्रमाणे विशाल असे आनंदपूर्ण वाटेल व त्यात तू खुशाल रमावे. प्रेयसीचे हे उद्गार ऐकून हताशपणे प्रियकर तिला प्रतिप्रश्न करतो. तो म्हणतो,

''काय राने पाचुची आता मला?
काय हे आकाश मौजेचे निळे?''

शेवटची ही व्दिपदी प्रियकराच्या प्रेमभंगाच्या दु:खाला अधिक उंचीवर नेणारी अशी आहे.

प्रेयसीने वार्‍यावर सोडलेल्या प्रियकराला उद्देशून 'मुक्त पक्षी' हे जे प्रतीक माधव जूलियन ह्यानीं योजले आहे; ते अत्यंत सूचक, अर्थपूर्ण व भावगर्भ असे आहे. ह्या प्रतीकामधून त्यांनी विरहाचे जे चित्रण केले आहे; ते अत्यंत आर्त आहे. म्हणूनच ते रसिकाला अस्वस्थ करून सोडणारेही आहे. भोळ्याभाबड्या प्रियकराबद्दल रसिकमनात सहानुभूती निर्माण होते, तर त्याला फसवणार्‍या प्रेयसीबद्दल चीड निर्माण होते. संपूर्ण गझलेत साधेसोपेपणा, ओघवतेपणा व सहजस्वाभाविकपणा ओतप्रोत आहे. प्रेयसीने आपल्याला वार्‍यावर सोडले, ह्याबद्दलचा राग निमूटपणे गिळणारा-सहन करणारा एक संयमी, सोशीक व समंजस प्रियकर जसा ह्या गझलेतून पहावयास मिळतो; तसाच तो मनातून दुभंगलेला आहे, हताश झालेला आहे, हेही पहावयास मिळते. प्रेयसीने कितीही लाथाडले, कितीही कठोरपणा दाखवला; तरी माधव जूलियनांच्या प्रेमकवितेतील प्रियकर ते सर्व मुकाटपणे सहन करतो; ह्याच सत्याचा पुनःप्रत्यय 'मुक्त पक्षी' ही प्रेमविषयक गझलसुद्धा देते, ह्यात शंका नाही.
अशा प्रकारे उत्कृष्ट प्रेमकवितेचे सर्व गुणविशेष माधव जूलियनांच्या 'मुक्त पक्षी' ह्या प्रेमविषयक गझलेत दृग्गोचर होत राहतात.
________________________________________
डॉ. अविनाश सांगोलेकर,
प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग,
सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ,
पुणे- ४११ ००७
(भ्रमण ध्वनी  ९८५०६१३६०२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा