_________________राजीव मासरूळकर___दोन गझला_______________


1.

चंद्र मी झाकून आहे आत माझ्या;
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !

वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे;
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या.

जाळतो मी जात वशिला अन् गरीबी;
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या.

वाटता तुज जाहले बेरंग जगणे;
घे सखे रंगून तू रंगात माझ्या.

पेरणी कवितेत अर्थाची करावी;
तीच शक्ती ओततो औतात माझ्या.

जन्मलो चिखलात मी राजीव होउन;
वाहतो मृद्गंधही श्वासात माझ्या !

2.

घडू जे नये ते घडे रोज हल्ली;
खरे कोपऱ्‍याला दडे रोज हल्ली.

फितूरी चहाडी मुजोरी लबाडी;
शिकाया मिळावे धडे रोज हल्ली.

सुखाचे कुठे येथ गर्भार होणे ?
तुटे मायचे आतडे रोज हल्ली.

कधी ना कुणाला कटू बोलला तो;
स्वतःला शिवी हासडे रोज हल्ली.

"विकासातुनी जा लयाला, मनूजा"
थरारे धरा , ओरडे रोज हल्ली.
________________________________

राजीव मासरूळकर,
शिक्षण विस्तार अधिकारी,
पं. स. सोयगाव, जि. औरंगाबाद
मो. क्र. 9423862938






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा