__________________________खलील मोमीन___दोन गझला________________


1.

जीवना थांबू नको रे अवखळा;
ते सुखी डबके नव्हे ती अवकळा.

काय काळाचा मळाही करपला;
दे दिलासा वाहुनी तू खळखळा.

दु:ख देते भान वेडया,सुख नव्हे; 
सोस त्याला,मानतो का अडथळा?

धोंड वाटेतील होण्याऐवजी-
बाल हातातील हो तू खुळखुळा.

सत्य जैसे धीट तैशी नजरही;
रोखता,कापेल खोटे चळचळा.

वाहणे,शिंपीत जाणे,फुलविणे;
जीवनाचा अर्थ आहे कळवळा!

2.

सुखाची नि माझी चुकामूक झाली;
जिण्याची खरी रीत ठाऊक झाली.

भला दाम प्रश्नास देणार होतो;
पुढे उत्तरे स्वस्त घाऊक झाली.

शमेना तरी आस त्या उत्तरांनी;
तशी उत्तरेही पुन्हा मूक झाली.

किती सोस होता व्यथा सोसण्याचा;
अपेक्षा भिकेचीच का भूक झाली. 

तरी दु:ख मैत्री करेना, म्हणाले,
"सवे मी तुझ्या चाललो चूक झाली!"

रडू लागले हासणे जीवनाला;
म्हणे काळ थोडी करमणूक झाली.
____________________________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा