1.
खांदा तुझा मिळावा टेकायला जरा;
मी भेटले सुखाला सांगायला जरा.
कळतील चेहरेही कुठले खरे खुरे;
लोकात लागते पण मिसळायला जरा.
मी सोबतीस माझ्या अंधार घेतला;
झाला उशीर सूर्या उगवायला जरा.
आत्ताच मारली बघ गंगेत मी उडी;
लागेल वेळ पाणी निवळायला जरा.
आता नवा नकाशा बनवायला हवा;
सांगू हिमालयाला सरकायला जरा.
दिसले तुला कुठे तर शोधून दे मला;
क्षण घेतले सुखाचे मोजायला जरा.
आहे अपूर्ण तेथे माझ्याशिवाय तो;
येशील का असे भ्रम तोडायला जरा.
जगता कुठे सुखाने येईल माणसा?
असले ठिकाण जाऊ शोधायला जरा!
2.
केलेस तर हे एवढे उपकार कर;
फेकून दे खंजिर फुलाने वार कर.
आहे तुझ्या हातात काही वेगळे?
असलेच तर दिवसा प्रभो अंधार कर.
आयुष्यभर रांगत कशाला राहिल्या;
सगळ्याच इच्छांची मना तू घार कर.
हंगाम हिरवा बारमाही पाहिजे;
यंदा तरी हे स्वप्न तू साकार कर.
भोगायचे आहे इथे चुकले कुणा?
चल संकटांना मोकळे घरदार कर.
येतोस तू...जातोस तू...मर्जी तुझी;
माझ्या मनाला तेवढे खिंडार कर!
उल्केपरी चल सोडते आकाश मी;
तू काळजाचे एकदा 'लोणार' कर!
होते अहिल्या रोज माझी कैकदा;
रामा शिळा समजून तर उद्धार कर!
आतून तू सुरवात कर शोधायला;
दिसला कुठे माणूस तर जोहार कर.
3.
बदलून आज पाहू काळासमान आपण;
नात्याशिवाय वागू नात्यासमान आपण.
अंदाज तू कशाला लावायला निघाला;
नियती समोर जावू मर्दासमान आपण.
जगणार का सुखाने दु:खाशिवाय कोणी?
असले विचार करतो थोरासमान आपण.
ठेवायची कशाला माझी तुझी उधारी;
आता घरात वागू वाण्यासमान आपण.
कुठला हिशोब नाही कुठलेच भोग नाही;
धरती करायची का स्वर्गासमान आपण.
सगळ्याच वेदनांशी का एकरूप झालो;
आहोत ना मनाने पाण्यासमान आपण.
आयुष्यभर जळालो इतकी दिली परीक्षा;
होणार शेवटी पण सोन्यासमान आपण.
जगणे नको नकोसे वाटे मला तुलाही;
शून्यात जायचे का गर्भासमान आपण.
_______________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा