1.
कधी माती,कधी ती लाकडाची खेळणी होती;
तरी त्या देखण्या खेळात सारी देखणी होती.
किती स्वादिष्ट लागे भाकरीसंगे वरण साधे;
कशी जगण्यास आईने दिलेली फोडणी होती.
जमेना लपविणे कोणासही शेजारची दुःखे;
गळ्याशी हुंदके होते नि ओली पापणी होती.
असे वाटायचे की चंदनाचा लेप तो शीतल;
तिने घावावरी जी बांधलेली ओढणी होती.
तरी ताटात एका सर्व बंधू जेवलो आम्ही;
घरातच आमच्या जेव्हा घराची वाटणी होती.
2.
झाडे समस्त वरचढ सारी अशी सरस;
करतो फुले उन्हाची पण एकटा पळस.
इकडे मुले तुपाशी,तिकडे कुपोषणे;
चंद्रास पौर्णिमा या चंद्रास त्या अवस.
गरिबाकडेच नाही ते लिफ्ट, ती शिडी;
अन् रोज ही महागाई गाठते कळस.
का द्यावया तुला मी ठरवू बळी फुले;
प्रेमासमोर कसले फेडायचे नवस.
शेताकडून शिकते हे तत्त्व शायरी-
उत्तम हवे बियाणे ,माती हवी सकस!
_____________________________________
नजीमखान
खलसे प्लाॅट ,राऊतवाडी,
चिखली, जि.बुलढाणा
मो.9850867162
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा