________________________निलेश कवडे____चार गझला______________



1.

लाभली ना जिंदगी मज चांदण्यांखाली;
जिंदगी आजन्म गेली आसवांखाली!

केवढी शोकांतिका या लोकशाहीची:
चालला व्यवहार सारा टेबलांखाली!

दुःख लपलेले निघाले...मी जसा निजलो...
टोचला काटा...सुखाच्या पाकळ्यांखाली!

जाळले काळीज माझे मी उजेडाला;
लपविला अंधार माझ्या पापण्यांखाली.

वासने! माझे तुझ्याशी ना कधी पटले;
राहतो मी संयमाच्या पाय-यांखाली!

2.

जिंदगीच्या चौकटी मी तोडल्यावर;
जिंदगी कळली स्वतःला शोधल्यावर.

फडफडाया लागतो मग तो दिवाही...
येउनी जवळी प्रिया ती लाजल्यावर!

विनवणी करतात डोळे पावसाला...
आजही शेतात काही पेरल्यावर!

केवढे आहे बरे तुमचे तुम्हाला...
झोप येते चांदण्यांना मोजल्यावर.

माजले गगनी जरी हे ढग कितीही;
सूर्य लपला ना ढगांनी झाकल्यावर.

पापण्यांची शेवटी मग हार होते;
आसवांचे लोचनी थर साचल्यावर.

काळजाचे हाल मी पत्रात लिहले;
बोलणे सुचते कुठे 'तू' भेटल्यावर!

चळवळी झाल्यात पण गेल्या न जाती;
नोंद जातीची तरीही दाखल्यावर!

3.

धर्म जाती अन् रुढीच्या वाढल्या भिंती;
या पुढा-यांनी नव्याने बांधल्या भिंती!

आजवर शाळेतल्या भिंती मुक्या होत्या...
साधण्या संवाद आता रंगल्या भिंती.

मी युगाचा कापला अंधार...मग आलो...
सूर्य शोधाया नवा ओलांडल्या भिंती!

का पुजावे माणसांना तोडणा-यांना?
का करावे माफ,ज्यांनी बांधल्या भिंती?

आज आहे कागदी तलवार पाठीशी;
कायद्याने गत रुढीच्या पाडल्या भिंती.

चार भिंती आड गेली जिंदगी माझी;
दुःख माझे ना कुणाला बोलल्या भिंती.

4.

देवा घडायचे जे अगदी तसे घडू दे;
जगणार मी मनाने,अनुभव भले कडू दे!

माझ्याच आसवांचा मज भार सोसवेना;
होईन मोकळा मी...मजला जरा रडू दे!

मी एवढीच करतो देवा, तुला विनंती :
आहे जसे...तिला हे काळीज आवडू दे!

संबंध पांडुरंगा, माझा जुळो तुझ्याशी,
तुटणार ना कधीही नाते असे जडू दे!

केव्हातरी पुराणी ती चाळणार रद्दी,
माझे गुलाब तेव्हा हातात सापडू दे!

येणार मग मजाही जगण्यात जिंदगानी;
नात्यास तू जरासे हळुवार उलगडू दे!
__________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा