_________________________शिल्पा देशपांडे____दोन गझला_______________


1.

आभाळ आसवांचे झाले भकास आता;
डोळ्यात पेरलेले दुष्काळभास आता.

पाऊस तांडवाची देतोय आज नांदी;
पान्हावल्या घनांचा संपेल श्वास आता.

सांडून प्रेम त्याने भरला उगीच प्याला;
मदिरेस आसवांचा येईल वास आता.

कानात बासरीच्या कान्हा हळू म्हणाला;
प्राणात राधिकेच्या घुमतोय रास आता.

संसार चंद्रमौळी...अंगात ऊनचोळी;
ऐन्यात भाकरीचे होतात भास आता.

देहास शोष आणि तेजाब आठवांचा;
आत्म्यास या गजलची लागेल प्यास आता.


2.

गल्लीत का फुलांनी गर्दी अमाप केली;
स्वप्ने खरीदणारा आला पुन्हा मवाली.

आता लपेट मजला हळूवार भोवताली;
मी तलम लाट बनुनी दर्यात तव निमाली.

परतून जा विजांनो नुरली अता गुलामी;
मी पापण्यात जपल्या जलबाव-या पखाली.

खाली अनंत पाणी वर मेघ दाटलेले;
ही कोणत्या पुराची बाधा नदीस झाली.

पाठीस सैल करता क्षितीजावरी नभाने;
टाचांस उंच करूनी धरणी मिठीत आली.

नाही कठीण तितके एकांत शोधणेही;
कोलाहलातही मी तादात्म्य पावलेली.
______________________________
शिल्पा देशपांडे,
D- 1004, पाम बीच रेसिडेन्सी,
प्लाॅट नं. २३-२९, सेक्टर-४,
नेरुळ, नवी मुंबई 400706
मोबाईल नं. 9820263223

३ टिप्पण्या: