___________________________ममता____दोन गझला___________________


1.

जन्म मला तू द्यावा आन्दण...पुढल्या जन्मी;
या जन्माची नको आठवण...पुढल्या जन्मी!

या ही जन्मी चुकली नाही पायपीट ही;
नक्की नसेल ना रे वणवण...पुढल्या जन्मी.

हवाहवासा कधी वाटला आयुष्या तू;
असेल जगण्याचे आकर्षण...पुढल्या जन्मी!

तुझ्यविणा या सहा ऋतूंचे काय करू मी..
ऋतू सातवा होवू आपण...पुढल्या जन्मी.

राग अनावर होता होता आवरेन मी...
पण प्रेमावर नको नियंत्रण...पुढल्या जन्मी.

गत जन्माचा शाप दिला तू या जन्माला;
उ:शापाचे दे नंदनवन...पुढल्या जन्मी!

2.

सुखाची आज अंतिम पातळी मी;
तुला देऊन सारे मोकळी मी.

मला बांधून घेणारे कडे तू;
तुझ्याशी जोडलेली साखळी मी.

कुणाहीसारखा नाहीस तू ही;
तुलाही वाटते ना वेगळी मी!

तुझ्याविण वाटते वठल्याप्रमाणे;
तुला स्पर्शून होते कोवळी मी!

फुलाचे नाव तू ओठांस द्यावे
खुडावी पाकळीने पाकळी मी!

हवा होतास तू यासाठीच तेव्हा;
किती उपवास केले निर्जळी मी.

कधी तू ही पुसावे कंदिलाला..
कितीदा सांग झटकू काजळी मी.
______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा